काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Mumbai

अवकाळी पावसामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजेच कोकण विभागात सरासरी 70 टक्के भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली, तर काही भागात 90 टक्के नुकसान आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी सरासरी 4600 मिमी पाऊस झाला आहे. या वर्षी दोन्ही जिल्ह्यातील 4 हजार 200 हेक्टरवर भात लागवड करण्यात आली. मात्र, या ठिकाणी सरासरी 5 हजार 500 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यातील सर्वाधिक आर्द्रता 95 टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर होऊनही अद्याप मदत प्राप्त झालेली नाही. भातपीक लागवडीस प्रत्यक्ष खर्च 792 प्रती गुंठा एवढा येतो. प्रती गुंठ्याला सरासरी 62 किलो भात पिकतो. 10 किलो भातापासून सरासरी 6 किलो तांदूळ मिळतो. भाताचा सरकारी दर हा 1850 प्रती क्विंटल आहे. उत्पादित केलेला माल बाजारात विकल्यास गुंठ्याला सरासरी 1147 रुपये शेतकर्‍यांना मिळतात. त्यामुळे भात उत्पादक गुंठ्याला किमान 600 रुपये नुकसानभरपाई क्षेत्राप्रमाणे द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजना बँक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना सक्तीची आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 43 हजार 500 एवढी आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या 70 ते 90 टक्के धान्य खराब झाले असेल तर शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्यामुळे कर्जदार शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. 2 हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकर्‍यांना क्षेत्रानुसार भरपाई देण्यात यावी. शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई संदर्भात निर्णय घेताना कोकणावर नेहमीच अन्याय झाला आहे. त्यामुळे आपले सरकार कोकणासंबंधात लक्ष देईल, याकडेही काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी शिष्टमंडळात काँग्रेसचे कोकण समन्वय संतोष केणे, आमदार खलिफे, प्रदेश सचिव रमेश किर, निलेश घाग, युवराज मोहिते आदी उपस्थित होते.