…म्हणून काँग्रेसचे आमदार कोळंबकर उतरले युतीच्या प्रचारात

मी काँग्रेसमधून बाहेर पडलो नाही तर काँग्रेसवाल्यांनी मला बाहेर काढले असल्याचा आरोप कालिदास कोळंबकर यांनी केला आहे.

Mumbai
Congress mp kalidas Kolambkar
काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर

दक्षिण-मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर उतरले आहेत. कालिदास कोळंबकर ऐन निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंसोबत प्रचारात दिसल्यामुळे याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड मोठा धक्का बसला आहे. दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसचे फक्त दोनच आमदार आहेत. त्यापैकी एक आमदार महायुतीसोबत प्रचारात सहभागी झाल्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. वडाळा येथील जनसंपर्क कार्यालयात महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी कालीदास कोळंबकर यांची भेट घेतली. दरम्यान, कोळंबकर यांनी देखील राहुल शेवाळे यांचे स्वागत केले.

दरम्यान, कालिदास कोळंबकर लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा करणार आहेत. या भेटी दरम्यान कालिदास कोळंबकर यांनी सांगितले की, मी काँग्रेसमधून बाहेर पडलो नाही तर काँग्रेसवाल्यांनी मला बाहेर काढले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसवाल्यांनी माझे फोटो काढले तर त्यामुळे मी त्यांचे फोटो काढून टाकले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मी बाळासाहेबांचा हाडामासाचा शिवसैनिक आहे. थोडी राजकीय समिकरणं बदलली. ते बदलण्यामागची काही कारणं देखील असल्याचे त्यांनी सांगितले. मुंख्यमंत्री चांगले काम करतात आणि चांगले काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे नेहमी उभे रहायचे असते. तसंच या विभागामध्ये विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आणि तसे काम सुध्दा सुरु केले असल्याचे कोळंबकर यांनी सांगितले.