वसई विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही

Mumbai
NCP congress alliance seat sharing formula

वसईत राजकीय ध्रुवीकरण सुरू झाले असून पक्षाला पालघर जिल्ह्यात सक्षम बनवण्यासाठी वसई विधानसभेची जागा पक्षाने लढवावी असा आग्रह वसईतील काँग्रेसजनांनी श्रेष्ठींकडे केली आहे. त्यासाठी तब्बल आठ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. इतकेच नाही तर पुढच्या वर्षी होणार्‍या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला भागीदारी मिळायला हवी, असाही आग्रह धरण्यात आला आहे. हितेंद्र ठाकूरांची त्यामुळे डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात आठ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने पालघर लोकसभेची जागा बहुजन विकास आघाडीला दिली होती. वसई विधानसभा मतदारसंघातून बविआच्या उमेदवाराला अवघ्या अकरा हजारांची आघाडी मिळाली आहे. तर नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात बविआ पिछाडीवर आहे. ही आकडीवारी पाहून वसईतील कांँग्रेसजनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

काँग्रेससोबत असल्याने वसई विधानसभा मतदारसंघात बविआला आघाडी मिळाली. काँग्रेसचा उमेदवार असता तर बविआ पिछाडीवर गेला असता. विधानसभेसाठी काँग्रेसने उमेदवार उभा केला तर बविआच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. म्हणूनच यावेळी तरी वसईची जागा काँग्रेसने लढवावी असा काँग्रेसजनांचा आग्रह आहे. तसेच पुढच्यावर्षी होणार्‍या वसई विरार महापालिका निवडणुकीत बविआकडून भागीदारी घ्यावी. तरच पालघर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढू शकेल, असे येथील काँग्रेसजनांचे मत आहे. कांँग्रेसजनांनी आग्रह लावून धरला तर मात्र बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची डोकेदुखी वाढणार आहे.