घरमुंबईमहापालिकेत काँग्रेस पक्ष नंबर वन

महापालिकेत काँग्रेस पक्ष नंबर वन

Subscribe

विरोधी  पक्षनेत्यांसह काँग्रेसचे तीन नगरसेवक टॉप टेनमध्ये  

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचे प्रगती पुस्तक दरवर्षी प्रजा फाऊंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात येते. या वर्षी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या प्रगती पुस्तकामध्ये आजवरच्या तुलनेत प्रथमच काँग्रेसचे तीन नगरसेवकांनी पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान मिळवले आहे. आजवर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक हे पहिल्या दहा क्रमांकामध्ये चमकायचे. परंतु यंदा प्रथमच विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह काँग्रेसच्या तीन  नगरसेवकांनी टॉप टेनमध्ये मजल मारली आहे. एवढेच नाही तर सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी असलेल्या भाजपला मागे टाकत काँग्रेस पक्ष हा महापालिकेत पहिला क्रमांक पटकावत सरस ठरला आहे.

प्रजा फाऊंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या प्रगतीपुस्तकामध्ये भाजपच्या हरिष छेडा आणि नेहल शाह यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक  मिळवला, तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर  अनुक्रमे शिवसेनेचे बाळा नर व समाधान सरवणकर हे आहेत. परंतु पहिल्या दहा क्रमांकामध्ये सत्ताधारी शिवसेनेचे केवळ दोनच नगरसेवक असून विरेाधी पक्षातील तीन नगरसेवक आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते रवी राजा(७वा क्रमांक), विरेंद्र चौधरी (८वा क्रमांक) आणि कमरजहाँ सिध्दीकी (१०वा क्रमांक) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा सत्ताधारी पक्षाचे केवळ दोनच नगरसेवक पहिल्या दहामध्ये असून भाजपच्या पाच नगरसेवकांचा त्यात समावेश आहे.

- Advertisement -

आजवरच्या प्रजाच्या अहवालात पहिल्या दहामध्ये ना  विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असायचा ना गटनेत्यांचा. परंतु यंदा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बाजी मारत आघाडी घेतली असून भाजपच्या गटनेत्यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे यंदा दोन गटनेत्यांचा समावेश टॉपटेन नगरसेवकांमध्ये झाला आहे.  आजवर विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे अनेक नगरसेवकांनी जबाबदारी पार पाडली असली तरी अभ्यासू नगरसेवक आणि आपल्या सहकारी नगरसेवकांना कायम मार्गदर्शन करणे यामुळे यंदा काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना पहिल्या दहामध्ये स्थान तर मिळवता आले. परंतु एकूण ३० नगरसेवकांपैंकी २८ नगरसेवकांची कामगिरी चांगल्या प्रकारचे प्रशस्ती पत्रक प्रजाच्या अहवालाद्वारे दिली आहे.  काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांची कन्या निकिता निकम,सुप्रिया मोरे वगळता उर्वरीत २८ नगरसेवकांची कामगिरी उत्तम असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले.

शिवसेना व भाजपची पिछेहाट

- Advertisement -

मात्र, महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी असलेल्या व अभ्यासू समजल्या जाणाऱ्या भाजपला मागे सारत काँग्रेसने पहिला क्रमांक मिळवला आहे.  काँग्रेस पक्षाने ५७.८६ एवढे गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर पहारेकरी असलेला भाजपचा दुसरा तर  सत्ताधारी शिवसेना पक्षाचा तिसरा क्रमांक आला आहे. शिवसेनेचे एकूण ९५ तर भाजपचे ८२ नगरसेवक आहेत. परंतु सर्वांधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेचे टॉप टेनमध्ये दोन  तर तळाच्या दहा क्रमांकामध्ये दोन नगरसेवकांचा समावेश आहे. सर्वांधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या नगरसेवकांच्या आधारे काँग्रेसच्या नगरसेवकांची कामगिरी उजवी ठरली आहे. त्यामुळे दोन प्रमुख पक्षाला मागे सारत काँग्रेसने विरोधी  पक्षनेते रवी राजा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या नगरसेवकांची कामगिरी उंचावली असल्याचे चित्र या अहवालावरुन स्पष्ट होते.

महापालिकेतील सर्वोत्तम पहिला क्रमांक : काँग्रेस

दुसरा क्रमांक : भाजप

तिसरा क्रमांक : शिवसेना

महापालिकेतील टॉप टेन नगरसेवक क्रमवारीनुसार
हरिष छेडा : भाजप
नेहल शाह : भाजप
अनंत नर :  शिवसेना
समाधान सरवणकर : शिवसेना
स्वप्ना म्हात्रे : भाजप
आशा मराठे : भाजप
रवी राजा : काँग्रेस
विरेंद्र चौधरी: काँग्रेस
प्रभाकर शिंदे : भाजप
कमरजहाँ सिध्दीकी : काँग्रेस


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -