Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई काँग्रेस निर्णयावर ठाम ! महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणार

काँग्रेस निर्णयावर ठाम ! महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणार

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. देशात एका राज्याएवढे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही वॉर्डमध्ये 100 दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन आखला आहे. वॉर्डनिहाय रिव्ह्यू करणार आणि एकटे लढण्याची आमचा निर्णय ठाम असल्याचेही भाई जगताप यांनी अधोरेखित केले आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणीही या निमित्ताने काँग्रेसने केली आहे. मनपाच्या तिजोरीवर केवळ 168 कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणे गरजेचे असल्याचेही मत भाई जगतापांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

पाणी माफिया मोठ्या प्रमणात पाणीचोरी करतात, त्याऐवजी हे पाणी गोरगरिबांना मिळायला हवे. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरे नियमित करण्याच्या घोषणा केल्या, पण त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्नही भाई जगपातांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेब थोरातांना मुंबईबद्दल आदर आहे, मुंबई अध्यक्षाबद्दल हे आज ठरलेले नाही. आमचे प्रभारी एच. के. पाटलांनी जे काही सांगितले ते योग्यच असल्याचेही भाई जगतापांनी अधोरेखित केले.

प्रत्येक वॉर्डात जनता दरबार
मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालते. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे 227 जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्याच दिवशी सांगितला होता. मुंबई अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा त्याचा पुनरुच्चारही केला होता. आम्ही पुढील 100 दिवसांत प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करू, लोकांची कामे करू, त्या कार्यकर्त्याला विचारू आणि त्यानंतर वरिष्ठांना 227 जागा का लढायच्या हे सांगू, असेही जगताप यांनी सांगितले होते. भाजपबरोबर सेना सत्तेत असताना मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकिते करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

- Advertisement -

- Advertisement -