कोटक-पाटील लढत चुरशीची

मतदारसंघ आढावा ईशान्य मुंबई मतदारसंघ

Mumbai

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराचा तिढा भाजपने सोडवत मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. कोटक यांचे प्राबल्य फक्त मुलुंडमध्येच असल्याने त्यांना निवडणुकीसाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे हे निश्चित. परंतु उमेदवारी जाहीर होताच कोटक यांनी लावलेल्या प्रचाराच्या धडाक्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय पाटील यांनी कडवी झुंज देतील यात शंकाच नाही. 2009 मध्ये खासदार असलेल्या संजय पाटील यांनीही जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच मनसेने पाटील यांना दिलेल्या पाठिब्यामुळे या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता मतदारसंघातून वर्तवली जात आहे.

मोदी लाटेमुळे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु यावेळी मोदी लाटेचा ओसलेल्या प्रभावामुळे संजय पाटील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना कडवी झुंज देतील, असे चित्र होते. त्यातच शिवसेनेने सोमय्या यांना केलेल्या विरोधामुळे पाटील यांच्या विजयाची आशा निर्माण झाली होती. भाजपने मुंबई महापालिकेत नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पाटील यांच्या विजयाची अधिकच शाश्वती निर्माण झाली. परंतु कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच सुरू केलेल्या जोरदार प्रचाराने ईशान्य मुंबईतील चित्र बदलण्यास सुरुवात केली.

कोटक हे नगरसेवक असल्याने त्यांची ओळख फक्त मुलुंडमधील नागरिकांमध्येच असल्याने त्यांच्यासाठी ही लढत सोपी नसणार असे बोलले जात आहे. कोटक यांनी मतदारसंघातील सर्व उद्याने, पार्क व मैदानात सकाळी फिरायला, जॉगिंगसाठी येणार्‍या तरुणांना व वृद्धांची भेट घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी नोकरीवर जाणार्‍या मतदारांची त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर भेट घेत त्यांच्यापर्यंत पोहचण्यास सुरुवात केली. अवघ्या काही दिवसांत कोटक यांनी सुरू केलेल्या जोरदार प्रचारामुळे मतदारसंघातील चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे कोटक यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असतानाही संजय पाटील यांनी प्रचाराचा धडका कायम ठेवला आहे. पाटील यांनीही त्यांचा हक्काचा मतदार असलेल्या भागामध्ये जोेरदार प्रचार करून आघाडी घेतली आहे.

संजय पाटील ईशान्य मुंबईचे खासदार असल्याने सर्व मतदारसंघात त्यांना ओळखले जाते. त्या तुलनेत कोटक यांना मुलुंड व भांडुप वगळता फारसे ओळख नाही. ही बाब पाटील यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहेत. तसेच मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार असल्याने मनसेचे मतदान पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईमध्ये मनसेचा मोठा मतदार आहे. या सर्व मतदारांनी जर संजय पाटील यांना मतदान केल्यास पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाली असली तरी शिवसेनेकडून भाजपला किती मतदान होईल याबाबत शंका उपस्थित करण्यात येत असल्याने मनोज कोटक यांच्यासमोर एक मोठे आव्हानच असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here