घरमुंबईविक्रमगडमध्ये एकच बँक असल्याने ग्राहकांची गैरसोय

विक्रमगडमध्ये एकच बँक असल्याने ग्राहकांची गैरसोय

Subscribe

विक्रमगड या आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यांतील जवळ जवळ दीड लाख जनतेकरीता एकमेव ट्रेझरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आहे. यात पगारदारांसह इतर ग्राहक (खातेदार) व विविध कार्यालये, असल्याने रेशनिंगसह इतर शासकीय कामानिमित्त चलन भरणार्‍यांची मोठी संख्या आहे. त्यामुळेच विक्रमगड येथील महाराष्ट्र बँकेसमोर ग्राहकांना मोठ्या रांगा लावून ताटकळत उभे राहवे लागते. ग्राहकांसाठी आवश्यक पिण्याच्या पाण्याची, प्रसाधन गृह व योग्य अशी बैठक व्यवस्था नसल्याने सुविधांचा अभाव आहे.

विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीपासूनच या तालुक्याला ट्रेझरी बँक नाही. यापूर्वी जव्हार येथील स्टेट बँकेतून हे व्यवहार होत होते. मात्र आता हेच व्यवहार विक्रमगडच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून होत आहेत. मात्र तालुका निर्मितीपासून विक्रमगडकरीता स्टेट बँक शाखेची मंजुरी देण्यात आली आहे. परंतु गेल्या 19 वर्षात येथे ही शाखा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामधंदा सोडुन ग्राहकांना येथील महाराष्ट्र बँकेत धाव घेऊन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

- Advertisement -

विक्रमगडमध्ये शासकीय,निमशासकीय,स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांची मोठी संख्या असल्याने प्रत्येकाला चलनाद्वारे पैसे भरावे लागतात. सध्या प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्र चलने भरणे बंधनकारक झाल्याने एक स्वस्त धान्य दुकानदार, मुद्रांक विक्रेत्यांना स्टॅम्प पेपर काढण्यासाठी वेगवेगळी चलने भरावी लागतात. परिणामी एका ग्राहकाच्या कामाच्या निपटारा करण्यासाठी तब्बल पंधरा वीस मिनिटांचा वेळ जातो. त्यामुळे बँकेसमोर मोठ्या रांगा लागून ग्राहकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे इतर कामे व परवाने घेण्यासाठी दूरवरुन लोक येत असतात. त्यांनादेखील परवाना शुल्क, शासकीय डिपॉझिट रुपाने प्रत्येकी एक-दोन चलने भरावी लागतात. याखेरीज शासकीय कामकाजा अंतर्गत येणार्‍या चलनाद्वारे पैसे भरणा करणे आवश्यक असल्याने दिवसात एक चलन भरण्यासाठी सरासरी अर्धा तासाचा अवधी लागत आहे.

विक्रमगडच्या बँक ऑफ महाराष्ट्र विक्रमगडच्या शाखेत ग्राहकांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याचा आरोप खातेदार करीत आहेत. येथे रांगेत ग्राहकांना तासनतास बँकेच्या बाहेर उन्हातान्हात, पावसात ताटकळत उभे राहावे लागत आहे. याठिकाणी ग्राहकांना साधी बसण्याची सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. रांगेमध्ये वयोवृध्दांची संख्या अधिक असल्याने कधीकधी वयोवृध्द चक्कर येऊन पडण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. तर येथे काम करणारे कर्मचारी मराठी भाषिक नसल्याने ग्राहकांना त्यांची भाषा समजत नाही. तर ग्राहकांची भाषा त्यांना समजत नसल्याने कामे होण्यास विलंब होत आहे. तर येथील कर्मचारी ग्राहकांशी निट बोलत नसल्याचाही आरोप खातेदारांनी केला आहे.

- Advertisement -

एकमेव ट्रेझरी बँक असल्याने येथे रोजच प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. मात्र बँकेकडून रांगेतील ग्राहकांसाठी ना पाण्याची, ना बसण्याची सोय असल्याने वयोवृध्दव्यक्तींना याचा त्रास होत असून चक्कर येऊन पडण्याचे प्रकारदेखील घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र बँकेने सोयी-सुविधा पुरवाव्यात व ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी. अन्यथा ग्राहकांना आंदोलन करावे लागणार आहे.
–जयप्रकाश आळशी, ग्राहक विक्रमगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -