पर्याय गायब झाल्याने बायफोकलचे विद्यार्थी हतबल

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कायम

Mumbai
online addmission

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ अद्यापही कायम आहे. बायफोकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी अर्जाच्या भाग दोनमध्ये दिलेल्या कॉलेजांचे पर्याय पूर्णपणे गायब झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याच्या एक दिवस अगोदर हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी थेट मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली. या गोंधळामुळे या अभ्यासक्रमाची 25 जूनला जाहीर होणारी गुणवत्ता यादी लांबणीवर जाणार आहे.

अकरावी प्रवेशामधील बायफोकल अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत 23 जूनला सायंकाळी 5 वाजता संपली. मात्र मुदत संपल्यानंतर रविवारी रात्री आणि सोमवारी बायफोकलच्या विद्यार्थ्यांना कॉलेजाचे पर्याय न भरलयाचे मेसेज आले. त्यानंतर त्यांनी लॉगिनमध्ये जाऊन आपला अर्ज पाहिला असता त्यांना अर्जातील कॉलेजांचे पर्यायच गायब झाल्याचे दिसून आले. कॉलेजांचे पर्याय गायब झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. मात्र याबाबत विद्यार्थ्यांना कार्यालयातील अधिकार्‍यांनकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

विद्यार्थी व पालकांना याबाबत मंत्रालयात बैठक सुरू असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे उत्तर अधिकार्‍यांकडून देण्यात येत होते. गुणवत्ता यादी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी घडलेल्या या प्रकाराने त्यातून मार्ग काढण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बायफोकलची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मुंबई विभागीय उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.