घरCORONA UPDATEअजून एका कोरोना रुग्णाचा सापडला मृतदेह, डोंबिवलीत खळबळ!

अजून एका कोरोना रुग्णाचा सापडला मृतदेह, डोंबिवलीत खळबळ!

Subscribe

डोंबिवली पूर्वेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथील कोविड सेंटर मधून गुरुवारी सकाळी बेपत्ता झालेल्या ५३ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह पश्चिमेतील खाडीत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद केली असून या रुग्णाने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव येथे राहणारे ५३ वर्षीय रुग्ण यांचा डोंबिवली पूर्व येथे चावी बनवण्याचा व्यवसाय आहे. २० जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे डोंबिवली पूर्व येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलातील कोविड सेंटर येथे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे ८ दिवसांतच त्यांना घरी पाठवण्यात आले होते. घरी आल्यानंतर पुन्हा त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला आणि त्यांना पुन्हा त्याच कोव्हीड सेंटरमध्ये पुन्हा दाखल करण्यात आले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

- Advertisement -

सेंटरमधल्या कर्मचाऱ्यांना रुग्णाचा पत्ताच नाही!

गुरुवारी सकाळी ५३ वर्षीय कोरोना रुग्ण यांच्या मुलाने त्यांना प्रकृतीबाबत चौकशी करण्यासाठी मोबाईलवर फोन केला. मात्र वडील फोन उचलत नसल्यामुळे अखेर मुलाने कोविड सेंटरच्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून चौकशी केली असता आम्हाला माहीत नसल्याचे उत्तर मुलाला तेथील कर्मचाऱ्यांनी दिले, असे त्यांच्या मुलाने म्हटले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर बेपत्ता झालेल्या रुग्णाचा शोध घेण्यात येत असताना सायंकाळी डोंबिवली पश्चिम येथील खाडीत एका इसमाचा मृतदेह विष्णू नगर पोलिसांना सापडला. सदर मृतदेह बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णाचा असल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली असून कोविड सेंटर मधून बेपत्ता झाल्यानंतर या रुग्णाने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसानी वर्तवली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती विष्णू नगर पोलिसानी दिली आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांना सेंटरमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत असतो. मात्र रुग्णाला सेंटरबाहेर पाठवतातच कसे? किंवा रुग्ण सेंटरच्या बाहेर जातोच कसा ? यावरून तेथील व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप मृत इसमाच्या मुलाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -