वसईतील करोना रुग्ण लाभापासून वंचित

महात्मा फुले योजनेचा लाभ मिळेना

Vasai
Vasai Virar Municipal Corporation

महात्मा फुले योजनेंतर्गत उपचारांसाठी वसई-विरार महापालिकेतील सहा रुग्णालयांना सरकारने अनुमती दिलेली आहे. मात्र याठिकाणी एकच रुग्णालय आहे. त्याही रुग्णालयाने आपल्याकड़े कर्मचारी उपलब्ध नाहीत, असे सांगत या योजनेंतर्गत उपचार करण्यापासून हात वर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत या योजनेंतर्गत वसई-विरार महापालिकेने किती रुग्णावर उपचार केले याची आकड़ेवारी जाहीर करावी, अशी मागणी वसईतील रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली आहे.

वसई-विरारमधील करोना रुग्णांना वसई-विरार महापालिकेकडून खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे या खासगी रुग्णालयात एकच जागा शिल्लक असल्याने येथील बेड बुक करण्यासाठी ३ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आल्याचेही एका रुग्णाच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे. वसईतील एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याने ही व्यक्ती पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये गेली होती. मात्र या ठिकाणी जागा मिळणे कठीण झाल्याने या व्यक्तीला नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

तर या खासगी रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयात एकच बेड शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. हा बेड बुक करायचा झाल्यास ३ लाख रुपये भरावे लागतील, असेही सांगण्यात आले. शिवाय यासाठी ’विशेष’ व्यक्तीची ओळख काढावी लागत असल्याचेही रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये जाण्यास रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दोन दिवसांपूर्वी विरार- पूर्व येथील एका रुग्णाला रुग्णवाहिकेअभावी कित्येक तास ताटकळत राहावे लागले होते. या रुग्णाच्या नातेवाईकांनी नालासोपारा येथील महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णवाहिकेसाठी फोन केला असता डिझेल नसल्याचे कारण देत चालकाने रुग्णवाहिका आणण्यास असमर्थता दर्शवल्याचे या रुग्णाला मदत करू इछुक असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. वसई-विरार महापालिकेने कोविड-१९ साठी केवळ ८ रुग्णवाहिका राखीव ठेवल्याचे येथील लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. पैकी वसईत ४ तर नालासोपारा-विरारकरता ४ रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे नालासोपारा-विरारमध्ये करोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे या रुग्णवाहिकांवर भार येत असल्याचेही लोकप्रतिनिधींचे म्हणणें आहे.