एका Corona रुग्णासाठी वापरले २ लाखांचे PPE किट आणि ५०० इंजेक्शन! – प्रवीण दरेकर

pravin darekar in vidhan parishad

राज्यात कोरोनाचं थैमान सुरू असताना एकीकडे डॉक्टरांना कोरोना योद्धे आणि देव मानलं जातं, त्याचवेळी दुसरीकडे काही डॉक्टर आणि रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या प्रकरणांची जशी माध्यमांमध्ये आणि जनतेमध्ये चर्चा झाली, तशीच ही प्रकरणं सध्या विधानपरिषदेत देखील चर्चेला येत आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावरून सरकारला परखड सवाल केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचं पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचं करण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रवीण दरेकर यांनी कोरोनाच्या रुग्णांची मुंबईतील रुग्णालयांकडून लूट सुरू असल्याच्या मुद्द्यावरून सरकारला परखड सवाल केले.

यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘एका रुग्णावर उपचार करताना ३५० रुपयांचं पीपीई किट कुर्ल्याच्या कोहिनूर हॉस्पिटलने २५०० रुपयांना लावलं. दिवसाला तीनदा या किटचे पैसे लावले गेले. १८ लाखांचं बिल दिलं आणि त्यातले २ लाख रुपये फक्त पीपीई किटचे होते. ८२ वर्षांच्या रुग्णावर ५०० इंजेक्शन्स लावल्याचं बिल लावलं. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये. पालिकेचं अशा रुग्णालयांवर नियंत्रण आहे की नाही?’, असा सवाल दरेकर यांनी केला.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी रुग्णांना आलेल्या लाखो रुपयांच्या बिलांच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारला. ‘राज्यात अनेक रुग्णांना लाखो रुपयांची बिलं आलेली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं की रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार होती. पण १ लाखांपासून २५ लाख रुपयांची बिलं ज्यांना आलीयेत, त्यांच्या बिलांचं तुम्ही काय करणार आहात? महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या सगळ्यांना घ्या आणि त्यांच्या बिलांचं पेमेंट करा’, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. तसेच, ‘मुंबई आणि नाशिकमध्ये केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडून आहेत. त्यांचं काय झालं? हे राज्य सरकारने सांगावं’, असं देखील ते यावेळी म्हणाले.

ज्या कोरोना योद्ध्यांचा सेवा देताना मृत्यू झाला, त्यांना शहीदांचा दर्जा देऊन त्यासाठीच्या उपाययोजना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.