गुगल मॅपवर दिसणार कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र

गुगल मॅपवर मुंबईतील कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची माहिती नागरिकांना सहज पाहता येणार आहे.

bmc

जगातील कोणतेही ठिकाण हे गुगल मॅपवर सहज शोधता येते. पण आता गुगल मॅपवर मुंबईतील कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची माहिती नागरिकांना सहज पाहता येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित ही सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई महापालिकेला गुगलने विनामूल्य सहकार्य केले आहे.

कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. अवाढव्य मुंबई महानगरात अशा प्रतिबंधात्मक क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना ठाऊक असणे, अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरुन नियमितपणे प्रकाशित करण्यात येते. या संकेतस्थळावर मुंबईतील २४ विभागनिहाय नकाशांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्रदेखील दर्शविण्यात येतात. मात्र नागरिकांना एका क्लिकवर आणि सहजसोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, त्याची व्यापकता वाढावी या उद्देशाने मुंबई महापालिकेने गुगल मॅपची मदत घेण्याचे ठरवले. गुगलला देखील ही कल्पना आवडली आणि त्यांनी गुगल मॅपवर या प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखित नकाशे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या विभाग कार्यालयांकडून वेळोवेळी पुरवल्या जाणार्‍या अद्ययावत माहितीनुसार हे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशे सर्व नागरिकांना पाहता येतील. त्यासाठी मोबाईलवर गुगल मॅप हे अ‍ॅप्लिकेशन सुरु केल्यानंतर ‘कोविड १९ इन्फो’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर मुंबईचा नकाशा झूम करुन पाहताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात व कोविड १९ कन्टेन्मेंट झोन या उपशीर्षकासह दिसू लागतात. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते. यामुळे आपण नेमके कोठे आहोत, आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे किंवा नाही, असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे, हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे. नुकतीच ही सुविधा सुरु झाली असून त्यामध्ये वेळोवेळी अद्ययावत बदल केले जातील.

गुगल मॅपवर कोविड १९ इन्फो हा पर्याय निवडल्यानंतर मुंबई महापालिका या पर्यायावर क्लिक केले तर थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर stopcoronavirus.gov.in या लिंकवर कोरोनाविषयक माहिती देखील पाहता येते. गुगल सर्च इंजिनमध्ये मुंबई कोरोना व्हायरस अपडेट्स असे टाईप करताच महापालिकेच्या संकेतस्थळावरुन तसेच सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवरुन प्रसारित होणारी माहिती पाहता येते. कोरोनाविषयक रुग्णसंख्या, रुग्णालये, रुग्णशय्या, वेगवेगळ्या आकडेवारीचे विश्लेषण या सर्वांचा डॅशबोर्ड माहिती स्वरुपात संकेतस्थळावर दररोज उपलब्ध करुन दिला जातो. त्यापाठोपाठ आता गुगल मॅपवर मुंबईने उपलब्ध करुन दिलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशेदेखील इतर शहरांच्या पसंतीस उतरले आहेत. यामुळे इतर शहरांच्या प्रशासनानेही गुगलसोबत मिळून त्याचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे.