विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना

मुंबईच्या घरीच क्वॉरंटाईन

नाना पटोले

विधानसभेचे अधिवेशन तोंडावर असतानाच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे ते मुंबईतल्या घरीच क्वॉरंटाईन झाले आहेत.

राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर पटोले हे मुंबईतल्या घरीच क्वॉरंटाईन झाले असून त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने अधिवेशनाच्या कार्यक्रमात बदल झाल्याबाबत अजून शासनाने काहीही कळवलेले नाही.

येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनासाठी राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार असून ज्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-१९साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.

सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल. सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतची सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जाणार आहे.