घरताज्या घडामोडीकोरोनामुळे भविष्यात आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याचा धडा - महापौर

कोरोनामुळे भविष्यात आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याचा धडा – महापौर

Subscribe

कोरोनाशी लढा देताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आता कोरोनावरील लस आली असून लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र कोरोनामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेला भविष्याच्या दृष्टीने किती सक्षम व्हावे लागेल, याबाबत चांगलाच धडा मिळाला आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालयात आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त, मुंबईची प्रथम नागरिक हया नात्याने त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. मागील वर्ष हे आपल्या सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले होते. या कोरोनाशी आजही आपली आरोग्य यंत्रणा आणि मुंबईकर हे संघर्ष करीत आहेत. कोरोनाशी लढा देताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आता कोरोनावरील लस आली असून लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र कोरोनामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेला भविष्याच्या दृष्टीने किती सक्षम व्हावे लागेल, याबाबत चांगलाच धडा मिळाला आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत कोरोनाचा मोठा आर्थिक फटका सर्वानाच बसला आहे. कोरोनाशी संघर्ष करताना मुंबई महापालिकेला भविष्यातील आजारांच्या संकटांची जाणीव झाली असून महापालिका आपल्या आरोग्य सेवांचे अधिक उत्तमरित्या अद्ययावतीकरण करीत आहे. कांजूरमार्ग येथील महानगरपालिका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर कोरोनाची लस साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजनांवर भर देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य सरकारही अहोरात्र मेहनत घेत आहे.

२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाने प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा स्वीकार केला. भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व प्रजासत्ताक देश असून आपल्या भारत देशाने त्रिस्तरीय लोकशाही पद्धत स्वीकारली आहे. समाजाच्या तळापर्यंत लोकशाही व्यवस्था झिरपावी हया हेतूने ७३वी आणि ७४वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि सदर दुरुस्तीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेमध्ये प्रभाग समित्यांची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचा कारभार गतीमान आणि लोकाभिमुख झाला. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी हा कालावधी ‘लोकशाही पंधरवडा’ म्हणून साजरा करण्याबाबत, राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा ‘लोकशाहीचा उत्सव’ आहे. विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे, असे महापौरांनी म्हटले आहे. कोरोनामुळे प्राण गमावणार्या कर्मचारी, नागरिकांना महापौरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘कोविड-१९’ या आजाराशी आपण सर्वांनीच समर्थपणे लढा दिला आणि हा लढा आजही सुरु आहे. हया आजाराशी लढा देताना अनेक नागरिकांना तसेच आरोग्य सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाची तमा न बाळगता संघर्ष करावा लागला. अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे दुःख व्यक्त करीत महापौरांनी श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

कोविड-१९ हया आजारावरील ‘कोविशिल्ड’ ही लस मुंबईमध्ये उपलब्ध झाली असून मुंबई महापालिकेतर्फे पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी कुठलीही भिती आणि चिंता न बाळगता टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. मात्र लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपलेली नसून हयानंतरही नागरिकांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात धुणे ही त्रिसुत्री अंगिकारणे अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकूण मालमत्ता करामध्ये ४० टक्के इतकी वाढ होणे अपेक्षित होते मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर करदात्या नागरिकांवर अधिक आर्थिक बोजा पडू नये म्हणून यावर्षी मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ न करता, मागील वर्षीप्रमाणेच मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. तसेच, ५०० चौ. -फूट किंवा त्याहून कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांकरिता, महानगरपालिका आकारित असलेल्या मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर १०० टक्के माफ करण्याचे शासन निर्णयानुसार मान्य करण्यात आले आहे, असे महापौरांनी म्हटले आहे.

अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायु प्रदुषणाचे प्रमाणही वाढले आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने ही बाब घातक आहे. मुंबईतील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मुंबईतील मुख्य रस्ते आठवडयातून एक दिवस सायकल चालविण्याकरिता आरक्षित ठेवण्यात यावेत व याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे. मुंबई महापालिकेने नागरी आणि सामाजिक दायित्वाबरोबरच ऐतिहासिक वारसाही जपला आहे. सव्वाशे वर्षे पूर्ण झालेली गॉथिक शैलीमध्ये बांधलेली महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक व पुरातन इमारत ही देश-विदेशातील पर्यटकांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. भविष्यात मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन मंडळ हयांच्यामधील सामंजस्य करारानुसार ऑनलाईन बुकींग करुन ही इमारत दर महिन्यातील साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पाहण्याकरिता उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.

- Advertisement -


हेही वाचा – शेतकऱ्यांचा आक्रोश चिरडून टाकण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरूय – बाळासाहेब थोरात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -