CoronaVirus: आता भाजीपाला घराजवळ उपलब्ध करून देणार

ठाणेकरांना आता घराजवळ भाजीपाला उपलब्ध करून देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

Thane
Control room set up to facilitate the transportation of essential goods
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होण्यासाठी उभारले नियंत्रण कक्ष

राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

हातगाडी विक्रेत्यांच्या मार्फत चौकाचौकामध्ये भाजीपाला

सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरी देखील नागरिक बाजारामध्ये तसेच भाजीमंडई गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला नागरिकांना घराजवळ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगर पालिकांना किरकोळ हातगाडी विक्रेत्यांच्या मार्फत चौकाचौकामध्ये भाजीपाला आणि फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी देखील मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये याबाबत संबधितांना सूचना देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक

या भाजी विक्रेत्यांनी सर्व सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. मास्क, हातमोजे, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दी करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले आहे.

जेवढी गर्दी टाळणे शक्य तेवढी गर्दी टाळा

किराणामालाची दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक आहे. उगीचच घाबरून जाऊन साठा करून ठेवू नका. किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. तसेच नागरिकांनी थेट दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा यादी तयार करून पाठवावी. दुकानदाराने दिलेल्या वेळी जाऊन सामानाची उचल करावी. जेवढी गर्दी टाळणे शक्य तेवढी गर्दी टाळा, सुरक्षित अंतर राखा प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: ‘२१ दिवस लॉकडाऊनचे पालन करून करोनाला हरवूया’


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here