घरमुंबईपालिकेच्या इमारत दुरूस्ती कंत्राटात २ कोटींचा भ्रष्टाचार

पालिकेच्या इमारत दुरूस्ती कंत्राटात २ कोटींचा भ्रष्टाचार

Subscribe

प्रकल्पबाधित वसाहतींच्या दुरुस्तीची कामे एक सारखीच…पण एका कामासाठी जो दर दिला जातो त्यापेक्षा १हजार ११६ रुपये जास्त प्रति चौरस मीटरचा दर अन्य कंत्राटदाराने दुसर्‍या कामासाठी लावलेला आहेे. तब्बल दोन कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने झालेला आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून चेंबूरमधील मुकुंदनगर आणि वाशीनाका येथील व्हिडीओकॉन अतिथी या प्रकल्पबाधिता वसाहतींच्याही दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले आहे. चेंबूर आणि वाशीनाका येथील प्रकल्पबाधित इमारतीच्या दुरुस्तीचे काम एकाच प्रकारचे असूनही एका कंत्राटदाराला यासाठी प्रति चौरस मीटरसाठी तब्बल १ हजार ११६ रुपये अधिक दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेचे सुमारे दोन कोटींचे रुपयांचे नुकसान होणार आहे. दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा प्रयत्न उघड होत आहे.

- Advertisement -

मुंबईतील तानसा जलवाहिनी लगतच्या बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन माहुलमधील प्रकल्पबाधित वसाहतींसह चेंबूर मैसूर वसाहतीतील मुकुंदनगर आणि वाशीनाका येथील एल. यु. गडकरी मार्गवरील व्हिडीओकॉन अतिथी या प्रकल्पबाधितांच्या वसाहतींमध्येही केले जाते. माहुलमधील एव्हरस्माईल प्रकल्पबाधित वसाहतींतील नरक यातनांबाबत सर्वांनीच आवाज उठवल्यानंतर त्याची दरुस्ती तसेच इतर कामे महापालिकेच्यावतीनं हाती घेण्यात आली आहे.

या प्रकल्पबाधित वसाहतीसह आता चेंबूर मैसूर वसाहतीतील मुकुंदनगर प्रकल्पबाधित वसाहतींची दुरावस्था झाल्याने तेथील १३ इमारतींच्या दुरुस्तीचाही निर्णय घेण्यात आला. तळ अधिक चार मजली असलेल्या या इमारतींच्या दुरुस्तीचे कंत्राट मेसर्स उमित कॉर्पोरेशन या कंपनीला देण्यात येत आहे. एकूण १८ हजार ४०६ चौरस मीटरचं बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी प्रति चौरस मीटरकरता ३ हजार ६०६ रुपये एवढा खर्च केला आहे.

- Advertisement -

एम पूर्व येथील एल.यु. गडकरी मार्ग व्हिडीओकॉन अतिथी प्रकल्पबाधितांच्या २१ इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तळ अधिक पाच मजली इमारतीच्या या दुरुस्तीचं कंत्राट देव इंजिनिअर्स या कंपनीला देण्यात येत आहे. या कंपनीने प्रति चौरस मीटरसाठी २ हजार ४९०चा खर्च आकारला आहे. या सर्व इमारतींच्या दुरुस्तीचे ७९ हजार १५७ चौरस मीटर एवढं बांधकाम आहे. दोन्ही प्रकल्पबाधित वसाहतीतील इमारतींच्या दुरुस्तीसाठी एकत्र निविदा मागवून एकत्र उघडल्यानंतरही एकाच प्रकारच्या दुरुस्ती कामांसाठी चौरस मीटरचा खर्च वेगवेगळा आहे.

एम पूर्व येथील एल. यु. गडकरी मार्ग येथील एस.जी.केमिकल्स या प्रकल्पबाधितांच्या १९ इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तळ अधिक सात मजल्यांच्या या इमारतींच्या दुरुस्तीसाठी राजदीप एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली आहे. एकूण ८१ हजार ०३३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या बांधकामाची दुरुस्ती यासाठी प्रति चौरस मीटरसाठी २ हजार ४१६ रुपये एवढा खर्च दर्शवला आहे.

व्हिडीओकॉन अतिथी या प्रकल्पबाधित इमारतींसाठी प्रति चौरस मीटरसाठी जिथं २ हजार ४९० रुपयांचा दुरुस्ती खर्च येतो, तिथे मुकुंदनगर प्रकल्पबाधित वसाहतीतील इमारत दुरुस्तीसाठी प्रति चौरस मीटर ३ हजार ६०६ रुपये अर्थात १ हजार ११६ रुपये अधिक रुपये हे मोजले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचं सुमारे दोन कोटी १९ लाख रुपयांचं नुकसान होणार आहे. हे तिन्ही प्रस्ताव सध्या महापालिकेच्या स्थायी समिती आणि स्थापत्य समिती (उपनगरे) समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. आता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी एकाच भागातील एकाच प्रकारच्या दुरुस्तीसाठी प्रति चौरस मीटरचा खर्च हा एकच असायला हवा. परंतु एकाचवेळी निविदा काढूनही प्रशासनाने वाटाघाटी करून हा दर कमी करायला लावला होता.

हा दर खूपच अधिक असल्याचं सांगत नवीन इमारत बांधणीचा खर्च हा प्रति चौरस मीटर २२०० ते २५०० रुपये एवढा होतो. परंतु दुरुस्तीसाठीच जर एवढा खर्च येणार असेल तर तो योग्य नसून कुठेतरी कंत्राटदारांमध्ये संगनमत झाल्याचं दिसून येते असे समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख म्हणाले.

काम एकच, पण दर वेगळे एल.यु. गडकरी मार्ग व्हिडीओकॉन अतिथी प्रकल्पबाधितांचे दुरूस्ती काम

एकूण इमारतींची दुरुस्ती : २१
एकूण दुरुस्तींचं बांधकाम : ७९ हजार १५७ चौरस मीटर
दुरुस्ती खर्च : २ हजार ४९० रुपये प्रति चौरस मीटर
कंत्राटदार : देव इंजिनिअयरींग
एकूण खर्च : २५ कोटी १९ लाख रुपये

एल.यु. गडकरी मार्ग एस.जी. केमिकल्स या प्रकल्पबाधितांचे दुरूस्ती काम

एकूण इमारतींची दुरुस्ती : १९
एकूण दुरुस्तींचं बांधकाम : ८१ हजार ०३३ चौरस मीटर
दुरुस्ती खर्च : २ हजार ४१६ रुपये प्रति चौरस मीटर
कंत्राटदार : राजदीप एंटरप्रायझेस
एकूण खर्च : २० कोटी २६ लाख रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -