घरमुंबईजे.जे. हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक सर्जरी विभाग सुरू

जे.जे. हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक सर्जरी विभाग सुरू

Subscribe

ओठ मादक बनवणे, चेहर्‍यावरील व्रण घालवणे, तीळ काढणे,हनुवटीचा आकार बदलणे यासारख्या अनेक शस्त्रक्रिया करायच्या असतील तर हि बातमी नक्की वाचा...

ओठ मादक बनवणे, चेहर्‍यावरील व्रण घालवणे, तीळ काढणे, स्तनांचा आकार बदलणे, हनुवटीचा आकार बदलणे यासारख्या अनेक शस्त्रक्रिया करण्यासाठी सातत्याने प्लास्टिक सर्जरी विभागाकडे होत असलेली विचारणा लक्षात घेऊन मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक सर्जरीसाठी बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही आता महागड्या असलेल्या या सर्जरी करणे शक्य होणार आहे. ही ओपीडी एप्रिलपासून सुरू झाला असून, त्याची औपचारिक घोषणा ऑगस्टमध्ये होणार आहे.

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण चेहर्‍यावर शस्त्रक्रिया करतात. यामध्ये चित्रपटसृष्टीतील अभिनेते व अभिनेत्री आघाडीवर असतात. जाडे असलेले ओठ बारीक करून सौंदर्य वाढवणे, चेहर्‍यावरील व्रण संपुष्टात आणणे, हनुवटीमध्ये बदल करणे त्याचबरोबरच शरीरातील चरबी कमी करणे, स्तनाचा आकार वाढवणे, नाकाचा आकार बदलणे किंवा नवीन बसवणे, डोळ्यांच्या पापण्या, कानाचा आकार बदलणे यासारख्या अनेक शस्त्रक्रिया करून सौंदर्य वाढवण्याकडे अनेकांचा कल असतो.

- Advertisement -

त्यातही तरुण व तरुणींची संख्या अधिक असते. कारण कार्पोरेट क्षेत्रातील तरुणांचा याकडे अधिक कल असल्याचे दिसून येतो. तसेच लग्न ठरवण्यासाठीही अनेकजण कॉस्मेटिक सर्जरीबाबत विचारणा करत असतात. ही बाब लक्षात घेऊनच जे.जे. हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक सर्जरी ओपीडी सुरू करण्यात आल्याची माहिती प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घरवडे यांनी दिली. ओपीडी क्रमांक 35 मध्ये चालणार्‍या प्लास्टिक सर्जरी ओपीडीत दररोज 30 ते 35 जण उपचारासाठी येतात. यामध्ये जवळपास 10 ते 15 जण हे कॉस्मेटिक सर्जरीचे रुग्ण असतात. तसेच कॉस्मेटिक सर्जरीबाबत अन्य व्यक्तींकडूनही मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येते. कॉस्मेटिक सर्जरीसाठी खासगी रुग्णालयात दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. मात्र जे.जे. हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी मोफत होणार आहे. ओपीडी क्रमांक 35 मध्येच दर बुधवारी कॉस्मेटिक सर्जरीची ओपीडी चालवण्यात येत आहे.

कॉस्मेटिक सर्जरी ओपीडीसाठी प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर, कर्मचारी व शस्त्रक्रियागार वापरण्यात येणार आहे. त्यामुळे याचा हॉस्पिटल व्यवस्थेवर फारसा ताण येणार नाही. या ओपीडीबाबत नागरिकांना समजल्यावर त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल.  – डॉ. मुकुंद तायडे, अधिष्ठाता,जे.जे. हॉस्पिटल


सरकारी हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक सर्जरी होत नाही असा सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे. या ओपीडीबाबत लोकांना समजल्यावर त्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. त्यातच जे.जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनाही कॉस्मेटिक सर्जरीचे शिक्षण हॉस्पिटलमध्येच मिळणार आहे.
– डॉ. चंद्रकांत घरवडे, विभाग प्रमुख, प्लास्टिक सर्जरी विभाग, जे.जे. हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -