बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन : भारती सिंह – हर्षला मोठा झटका

कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबचिया यांना आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या धाडीमध्ये त्यांच्या घरात गांजा सापडल्याच्या प्रकरणात दोघांना याआधीच ताब्यात घेण्यात आले आहे. आज भारती सिंह आणि हर्षला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. याआधी त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली होती. या दोघांनीही जामीनासाठी याआधीच अर्ज केला आहे. या दोघांच्याही अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

भारती सिंह आणि तिचा पती हर्ष या दोघांनीही ड्रग्ज घेत असल्याबाबत एनसीबीसमोर कबुली दिली आहे. शनिवारी भारती आणि हर्षच्या घरी एनसीबीने छापा टाकला. तेव्हा त्यांच्या घरी ८६ ग्रॅम गांजाला सापडला होता. माहितीनुसार, एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि हर्षने ड्रग्ज घेण्याबाबत कबुली दिली आहे.घरात गांजा सापडल्यानंतर भारती आणि हर्षला एनसीबीचे समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलवण्यात आले होते. शनिवारी रात्री चौकशी झाल्यानंतर भारती सिंहला अटक करण्यात आली होती. भारती सिंह आणि हर्षला एकुण १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ४ डिसेंबरपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत.

एनसीबीकडून भारती आणि हर्षच्या नोकराची देखील चौकशी करण्यात आली होती. दोघांनी जिथून ड्रग्ज मागवले होते त्याचा सोर्स देखील एनसीबीला समजला आहे. भारतीला अटक केल्यानंतर एनसीबी कार्यालयात रात्रभर ठेवण्यात आले. भारतीची आई तिला भेटण्यासाठी एनसीबी कार्यालयात पोहोचली होती, पण तिच्या आईला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.