चांगली बातमी: मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी आता ३०० दिवसांवर

प्रातिनिधिक छायाचित्र

‘कोविड – १९’ बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने आता त्रिशतक गाठले आहे. याचाच अर्थ सांख्यिकीय विश्लेषणानुसार रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी आता तब्बल ३०० दिवसांवर पोहोचला आहे. याचबरोबर महापालिकेच्या २४ विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास ‘सी’ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ८०९ दिवसांवर पोहोचला आहे. तर ‘ई’, ‘बी’, ‘एफ-दक्षिण’ आणि ‘जी-उत्तर’ या ४ विभागांमध्ये रुग्ण दुपटीच्या कालावधीने ५०० दिवसांचा कालावधी पार केला आहे. उर्वरित १९ विभागांपैकी ३ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा ४०० दिवसांपेक्षा अधिक असून ८ विभागांमध्ये तो ३०० दिवसांपेक्षा अधिक; तर उर्वरित ८ विभागांमध्ये सदर कालावधी २०० दिवसांपेक्षा अधिक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण वाढीचा सरासरी दर हा आता आणखी घसरुन ०.२२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

मुंबईत सक्रीय रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने घट होत असून ही संख्या आज ११ हजार ५५७ इतकी झाली आहे. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या आणि रुग्ण वाढीचा दर हा सातत्याने कमी होत असला, तरीदेखील महानगरपालिकेद्वारे देण्यात येत असलेल्या कोविड विषयक सोयी-सुविधांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. तसेच सध्या चर्चात्मक पातळीवर असलेल्या कोविडच्या दुस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन हे सदैव सुसज्ज असल्याचे महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत ‘कोविड – १९’ संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या असून इतर अनेक शहरे, राज्ये एवढेच नव्हे तर इतर देशांनीही मुंबईचे ‘मॉडेल’ आपापल्या स्तरावर स्वीकारले आहे. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक यांनीही महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे जाहीर कौतुक केले आहे. त्याचबरोबर महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांच्या परिणामी मुंबईतील कोविडबाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.

  • रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने आज त्रिशतकी टप्पा ओलांडला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा हा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो. ही बाब लक्षात घेता, महानगरपालिकेने दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी रुग्ण दुप्पटीचे शतक गाठले होते. तर दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत म्हणजे दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी ५१ दिवसांनी वाढून २०८ दिवस इतका झाला होता.
  • १४ नोव्हेंबर २०२० रोजी रुग्ण दुपटीच्या कालावधीने २५५ दिवसांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर अवघ्या ४ दिवसांत म्हणजेच दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिवस संपताना रुग्ण दुपटीच्या कालावधीने आता ३०० दिवसांचा टप्पा ओलांडला आहे.
  • महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांचा स्वतंत्रपणे विचार करता, रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने ‘सी’ विभागात ८०९ दिवसांचा टप्पा गाठला आहे. तर या खालोखाल ४ विभागांमध्ये ५०० दिवसांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ‘ई’ विभागात ५५७ दिवस, ‘बी’ विभागात ५४६ दिवस, ‘एफ-दक्षिण’ विभागात ५२२ दिवस, तर ‘जी-उत्तर’ विभागात ५०९ दिवसांचा टप्पा गाठला आहे.
  • वरील विभागांव्यतिरिक्त ३ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा ४०० दिवसांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ‘जी-दक्षिण’ विभाग ४८९ दिवस, ‘एम-पूर्व’ विभाग ४४४ दिवस आणि ‘ए’ विभागात ४३९ दिवस इतका आहे.
  • उर्वरित १६ विभागांपैकी ८ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा ३०० पेक्षा अधिक दिवस असून, या व्यतिरिक्त इतर ८ विभागांमध्ये २०० दिवसांपेक्षा अधिक इतका रुग्ण दुपटीचा कालावधी आहे. तसेच रुग्ण दुपटीचा सर्वात कमी कालावधी हा आर-दक्षिण विभागात असून तो २३६ दिवस इतका आहे.
  • रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीमध्ये देखील लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढीचा दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक असल्याचे मानले जाते. हे पाहता, २९ ऑक्टोबर २०२० रोजी असलेला ०.४४ टक्के आणि ५ नोव्हेंबर २०२० रोजी ०.३३ टक्के इतका असणारा रुग्ण वाढीचा सरासरी दर आता ०.२२ टक्के इतका झाला आहे.