२४ तासात कोविडचे ८२,९६१ रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक

भारतामध्ये एका दिवसांत कोविडचे ८२ हजार ९६१ रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक

देशामध्ये काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात भारताने गेल्या २४ तासांमध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. भारतामध्ये एका दिवसांत कोविडचे ८२ हजार ९६१ रूग्ण बरे झाले आहेत. त्यांना विलगीकरण सुविधा केंद्र आणि हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ७८.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

२४ तासांत कोविडचे ८२ हजार ९६१ रुग्ण बरे झाले असून, एका दिवसातील रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक आहे. आतापर्यंत भारतामधील ३९ लाख ४२ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये भारताने नवा उच्चांक गाठला असताना यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातून एका दिवसांत तब्बल १९ हजार ४२३ रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण २३.४१ टक्के आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश ९६२८, कर्नाटक ७४०६, उत्तर प्रदेश ६६८० आणि तामिळनाडू ५७३५ या राज्यांचा मिळून वाटा ३५.५ टक्के आहे. या पाच राज्यात मिळून सुमारे ५९ टक्के नवीन रुग्ण बरे झाले आहेत. २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
आजपर्यंत देशात ९ लाख ९५ हजार ९३३ सक्रिय रुग्ण आहेत. बरे होणारे आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत बुधवारी २९ लाख ४६ हजार ४२७ पर्यंत पोहोचली आहे. बरे होणार्‍यांचे प्रमाण सक्रिय रुग्णांच्या जवळपास चौपट आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये जवळपास ६० टक्के सक्रिय रुग्ण आहेत.