घरमुंबईअटल बिहारी वाजपेयींचे स्मारक बीकेसीमध्ये? सीआरझेडचा फटका

अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक बीकेसीमध्ये? सीआरझेडचा फटका

Subscribe

बाळासाहेब ठाकरेंचे प्रस्तावित स्मारक आणि अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक यांच्या बांधकामामध्ये सीआरझेडचा अडथळा येत असल्याचं आज वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुंबईतील स्मारकासाठी जागेचा शोध सध्या सुरू आहे. वाजपेयींच्या स्मारकासाठी सुरूवातीला दक्षिण मुंबईत जागेचा शोध घेण्यात येत होता. पण आता वांद्रे-कुर्ला संकुलात स्मारकासाठीच्या जागेचा शोध सुरू झालेला आहे, असे उत्तर वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. अर्थसंकल्पीय भाषणावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना केसरकर यांनी मुंबईत स्मारकांच्या प्रकल्पाबाबतची माहिती स्पष्ट केली. मुंबईतल्या बीकेसीमध्ये येत्या काळात भूयारी मेट्रो, एलिव्हेटेड मेट्रो तसेच बुलेट ट्रेन यांसारख्या अनेक प्रकल्पांचे येत्या काही दिवसांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. तसेच दक्षिण मुंबईतील जागेची चणचण पाहता अखेर बीकेसीचा पर्याय या प्रकल्पासाठी निवडण्यात आला असल्याचे कळते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील भाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाला जागा मिळत नसल्याचा उल्लेख केला होता. त्यावर उत्तर देताना बीकेसीच्या पर्यायाचा विचार राज्य सरकार करत असल्याचे स्पष्ट केले.


हेही वाचा – ‘विरोधी पक्षनेते’ विखे पाटलांच्या प्रश्नांना ‘मंत्री’ विखे पाटलांचं उत्तर!

सीआरझेडमध्ये अडकली स्मारके

मुंबईत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात तर राजभवनानजीक असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पण कोस्टल रेग्युलेटरी झोनच्या नियम आणि अटींमध्ये ही दोन्ही स्मारके अडकली असल्याचे केसरकर यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची कमी केल्याबाबतचा धनंजय मुंडे यांचा मुद्दा केसरकरांनी खोडून काढला. शिवरायांचा पुतळा हा सर्वात उंच पुतळा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पुतळ्याची उंची कमी करण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण स्मारकाच्या धर्तीवरच ही दोन्ही स्मारके बांधण्यात येतील असे केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी सिडकोकडून निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -