घरमुंबईCSMT bridge Collapse: 'पपा कुठे गेले' चिमुकलिची आर्त हाक

CSMT bridge Collapse: ‘पपा कुठे गेले’ चिमुकलिची आर्त हाक

Subscribe

घराचा आधार असलेला आधारस्तंभ अचानक गेल्यामुळे दु:खी झालेल्या तपेंद्रसिंग यांच्या आईच्या डोळ्यातील आश्रू थांबत नाहीत.

मुलगी काही महिन्याची असताना पत्नी घर सोडून निघून गेल्यांनतर मुलीची सर्व जवाबदारी सीएसटीएम येथील पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तपेंद्रसिंग लुहिया यांच्यावर होती. घरचे त्याला दुसरे लग्न कर म्हणून मागे लागले होते मात्र त्याने मुलीला सावत्र आई नको म्हणून दुसरे लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकला होता. असे तपेंद्रसिंग याच्या बहिणीचे पती दीपसिंग कोली यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. तपेंद्रसिंग यांचे मुलीवर खूप प्रेम होते, मुलीसाठी खूप काही करायचे, तिला खूप शिकवायचे असे नेहमी तो आम्हाला सांगत होता, या वर्षी मुलीला शाळेत टाकायचे म्हणून त्याने तयारी देखील केली होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि तपेंद्रसिंगला आमच्या पासून हिरावून नेले, असे सांगताना तपेंद्र यांचे मेव्हुणे दीपसिंग यांचे डोळे पाणावले होते.

कुटुंबाचा आधार गेला

वडाळ्यातील कात्रज रोड या ठिकाणी असलेल्या माधवनगर येथील चाळीत तपेंद्रसिंग लुहिया (२८) हा आई चंद्रा, लहान भाऊ सुनील आणि ३ वर्षाची मुलगी तनिष्का यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून भाडेतत्वावर राहण्यास होता. तपेंद्रसिंगला दोन बहिणी असून त्यांचा विवाह होऊन त्या सासरी राहतात. मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यांनीच तपेंद्रसिंग यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती. पत्नी सोडून गेल्यावर मुलीची सर्व जबाबदारी तपेंद्रसिंग यांच्यावर आली होती. सीएसटीएम येथील एका जाहिरात कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरी करणारा तपेंद्रसिंग हा ७ वाजता नेहमीप्रमाणे कार्यालय बंद करून घरी जाण्यास निघाला. वाटेत जाता जाता त्याने अंधेरी येथे राहणाऱ्या बहिणीला फोन केला होता. बहिणींसोबत बोलून झाल्यावर त्याने फोन बंद करून टाइम्स इमारतीच्या दिशेहून पुलावर रेल्वे स्थानक येथे जात असताना पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटने तपेंद्रसिंग यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

तनिष्का पप्पांची वाट पाहतेय

तपेंद्रसिंगच्या मृत्यूची माहिती रात्री १० वाजता त्यांच्या घरच्यांना कळाली आणि संपूर्ण चाळीवर शोककळा पसरली. तपेंद्रसिंग यांचे मुलीवर खूप प्रेम होते. कामावरून घरी येताना दररोज मुलींसाठी तो खाऊ घेऊन येत होता, असे त्याचे शेजारी राहणारे सांगत होते. सहा महिन्याच्या मुलीला टाकून सोडून गेलेल्या पत्नीमुळे तो दुखी होता. मात्र, त्यातूनही त्याने स्वतःला सावरले होते. मुलीला आईची कमी त्याने कधीच भासू दिली नाही, असे तपेंद्रसिंग यांची आई चंद्रा या रडून रडून सांगत होत्या. घरातला एकुलता एक कमावता मुलगा गेल्यामुळे कुटुंबाचा आधारच गेला. मुलीच्या भविष्यासाठी त्याने बघितलेले स्वप्न क्षणात भंग पावले आहे. घराचा आधार असलेला आधारस्तंभ अचानक गेल्यामुळे दु:खी झालेल्या आईच्या डोळ्यातील आश्रू थांबत नव्हते. दुसरीकडे आपल्या वडिलांना नेमके काय झाले, ‘पपा कुठे गेले ,अजून कामावरून आले नाही का असा प्रश्न ३ वर्षाची तनिष्का आपल्या आत्याला विचारत होती, त्यावेळी घराजवळ जमलेल्या सर्वांचे डोळे पाणावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -