आजी, आई कुठं गेली ग, चिमुकल्या वयातच आईची माया हरपली

गुरूवारच्या पूल दुर्घटनेत जीटी हॉस्पीटलच्या नर्स अपूर्वा प्रभू यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गणेश आणि चिन्मयी या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले आहे.

Mumbai
सीएसएमटी पूल दुर्घटनेतील मृत परिचारिका अपूर्वा प्रभू

आई ही आईच असते. तिची माया निराळीच असते. पण काळ इतका निष्ठुर बनला की त्याने त्या दोन चिमुकल्यांची आईपासून ताटातूट केली. चिमुकल्या वयातच आईची माया हरपली. गुरूवारच्या पूल दुर्घटनेत अपूर्वा प्रभू यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गणेश आणि चिन्मयी या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले आहे. त्यांची चिमुकली नजर आईलाच शोधतेय. आजी, आई कुठे गेली ग. अशी विचारणा चिमुकली चिन्मयी करतेय. दरम्यान या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू यांच्यासह भक्ती शिंदे, रंजना तांबे या दोन परिचारिकांचा देखील मृत्यू झाला आहे, तर जीटी हॉस्पिटलचे एक कर्मचारी जखमी झाले आहेत. चौघेही एकाच वेळेस जीटी हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीसाठी येत असताना त्यांच्यावर कालाने घाला घातला.

चिमुकल्यांची आर्त हाक

डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील उदयराज इमारतीत अपूर्वा प्रभू या पती अभय प्रभू, मुलगा गणेश (वय ८) आणि मुलगी चिन्मयी (वय ६) आणि सासूबाई यांच्यासह राहत होत्या. मुंबईतील जीटी हॉस्पीटलमध्ये त्या नर्स होत्या. तर त्यांचे पती अभय प्रभू हे खासगी नोकरीला आहेत. त्यामुळे दोघे पती पत्नी कामावर गेल्यानंतर त्यांच्या सासू या गणेश आणि चिन्मयीचा सांभाळ करतात. गुरुवारी नाईट डयूटी असल्याने घरातील सर्व कामे करून त्या संध्याकाळी नोकरीवर निघाल्या. मात्र मुंबईतील पूल दुर्घटनेत अपूर्वा यांचा मृत्यू झाल्याचे समजताच, प्रभू कुटूंबाच्या पायाखालची वाळू सरकली.

न विसरता येणाऱ्या आठवणी

त्यांचे पती आणि सासू अपूर्वाच्या आठवणीने धाय मोकळून रडत आहेत. गणेश मोठा असल्याने समजदार आहे मात्र चिन्मयी लहान आहे. दोघेही आईच्या आठवणीने रडत आहेत. आजी आई कुठे गेली ग.. अशी विचारणा चिमुकली चिन्मयी करतेय. चिमुकल्या गणेश आणि चिन्मयीचे मातृछत्र हरपल्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. अपूर्वा या नेहमीच दुस- याच्या मदतीसाठी धावून जात असत. त्यांच्या या स्वभावाची आठवण रहिवाशांनी जागवली. अपूर्वा मनमिळावू व प्रेमळ स्वभावाच्या होत्या अशी आठवण त्यांचे जवळचे नातेवाईक अनंत तांबे यांनी सांगितली. अपूर्वा यांना एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत. अपूर्वाच्या आठवणीने त्याही ढसाढसा रडत आहेत. शुक्रवारी दुपारी डोंबिवलीतील शिवमंदिर मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here