CSMT स्टेशन दिसणार नव्या लुकमध्ये !

स्टेशन रिस्टोरेशनच्या कामासाठी राजस्थानहून कारागिर मुंबईत दाखल

जागतिक हेरीटेज दर्जा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनच्या कामासाठी राजस्थानहून कारागिर आणि कामगरांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. सीएसएमटी स्टेशनच्या टप्पेनिहाय असलेल्या रिस्टोरेशनच्या कामात छत, स्टार चेंबर आणि कॉन्फरन्स हॉल अशा स्वरूपाचे काम करण्यात येणार आहे.

सीएसएमटी स्टेशनच्या रिस्टोरेशनच्या कामाला १९९७ मध्ये सुरूवात झाली. सध्या सुरू असलेले काम हे दुसऱ्या टप्प्यातील काम आहे. हा संपुर्ण रिस्टोरेशनचा प्रकल्प काही ठराविक टप्प्यात विभागण्यात आला होता. स्टेशनच्या पश्चिमेकडील तसेच दक्षिणेचे काम आता पुर्ण झाले आहे. आता रिस्टोरेशनच्या मुख्य कामाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये छताचे काम करण्यात येणार आहे. तसेच मध्यवर्ती भागातील घुमटाचे काम होणार आहे. त्यामध्ये स्टार चेंबरचेही काम ठराविक टप्प्यात होईल. हे संपुर्ण रिस्टोरेशनचे काम हे कंझर्व्हेशन आर्किटेक्ट चेतन रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू आहे. तर स्टेशनच्या इमारतीचा मध्यवर्ती भागातील डोम हा रडार गनच्या माध्यमातून तपासला जात आहे. त्यामध्ये डोमसाठी वापरलेल्या दगडाची सध्याची स्थिती आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची गळती झाली आहे का याचा शोध रडारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्यामुळेच यापुढच्या कामातले टप्पे ठरणार आहेत. आतापर्यंत हे स्कॅनिंगचे काम पुर्ण करण्यात आले असून आता रिस्टोरेशनच्या कामासाठी राजस्थानहून कामगार आले आहेत. त्यानंतर स्टार चेंबर आणि इतर रूममध्ये एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने संपुर्ण रिस्टोरेशनचे काम करण्यात येईल.

सीएसएमटी स्टेशन हे युनेस्कोच्या जागतिक दर्जाच्या ग्रेड १ च्या हेरिटेज इमारतीपैकी एक बांधकाम आहे. त्यामुळेच कुशल कारागिर, दगड कारागिर, अभियंते आणि पर्यवेक्षक यांच्या अनुभवाच्या जोरावर हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये पुराभिलेखाची माहिती, नकाशे, जुने अहवाल यांचाही वापर करण्यात येत आहे.

या कामाचाच आणखी एक भाग म्हणजे इमारतीच्या समोरच्या भागाच्या दगडाची स्वच्छता करणे. हाय प्रेशरच्या पाण्याचा वापर करून हे काम करण्यात येईल. त्यामध्ये डोमच्या कामातील दुरूस्ती ही काही वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून डोम स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. तसेच जॉईंट रिपेअर करण्याचे कामही येत्या महिन्याअखेरीस पुर्ण होईल, अशी अपेक्षा मध्य रेल्वेमार्फत व्यक्त करण्यात आली आहे.