घरमुंबईवाजपेयी, महाजनांसमोर भाजपचे आताचे नेतृत्व खुजे!

वाजपेयी, महाजनांसमोर भाजपचे आताचे नेतृत्व खुजे!

Subscribe

पूर्वी अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी असे भाजपचे दिग्गज नेते आपल्याला मान देत असत, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला विचारतही नाहीत, याची सल गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलून दाखवली. त्यातून मोदींवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी वाजपेयी, अडवाणी आणि महाजन यांची मात्र मुक्तकंठाने स्तुती केली.

शिवाजी पार्कवरील दसर्‍या मेळाव्याच्या सभेत बोलताना उद्धव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा नागपूर ते मुंबई विमान प्रवास, या प्रवासात बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा प्रवास करतोय, हे कळताच वाजपेयी जवळ येतात. मायेने विचारपूस करतात. राज्यातल्या राजकारणावर बोलतात. वाजपेयींच्या या उत्तुंग व्यक्तीमत्वाची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. तेव्हा तर ते पंतप्रधानही नव्हते. आजच्या पंतप्रधानांची तुलनाच त्यांच्याशी करता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सभेत सांगितले. प्रमोद महाजन हे बाळासाहेबांबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर यायचे. राजकीय चर्चा झाली की मी या चर्चेत यायचो. महाजन यांची उंची आणि आजच्या नेत्यांनी उंची ही तुलनाच करता येणार नाही, असे सांगत उद्धव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती करायची वेळ आली तेव्हा बाबरी मशिदीचे प्रकरण उकरण्यात आले. हे करणारे कोण होते, असे विचारत उद्धव ठाकरेंनी आगामी काळ हा भाजपसाठी गंभीर आहे. हिंदूत्व ही कोणाची प्रॉपर्टी नाही, असेही त्यांनी भाजपला सुनावले.

- Advertisement -

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. आम्ही केवळ हिंदुत्वाचा विचार घेऊन अवमान सहन करून चेष्टा स्वीकारून आणि कमीपणा घेत सोबत आहोत, असे सांगताना विष्णूच्या ११ व्या अवताराचा उल्लेख करत उध्दव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातल्या सत्तेची चांगलीच भादरवून काढली. २०१९च्या निवडणुकीत काय होणार या सर्वांच्याच तोंडी असलेल्या मुद्याची उद्धव यांनी खिल्ली उडवली. आता महाराष्ट्रानेच यांचे काय करायचे ते ठरवले पाहिजे, असे सांगत उद्धव यांनी प्रत्येकाने ठरवावे मी करणार म्हणून, असे अपील करत मर्दपणा असेल त्यांनीच आपल्यासोबत राहावे, या आपल्या आधीच्या वक्तव्याची री ओढली. उद्धव यांची ही बोली म्हणजे भाजपशी पंगा घेण्याची तयारीची पहिली पायरी आहे.

दिलेल्या आश्वासनांची तुम्हाला आठवण राहत नाही. दिलेली आश्वासने ही तुम्हाला जुमला वाटत असतील तर हा जुमला म्हणजे काय ते लोकंच तुम्हाला दाखवतील, असे सांगत ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्याला हात घातला. राम मंंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही देंगे या भाजपच्या कृतीची त्यांनी चांगलीच चिरफाड केली. राम मंदिरालाही जुमला म्हणून गणत असाल तर तुमचे डीएनए तपासल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्धव यांनी भाजपशी दोन हात करण्याची तयारी असल्याचेच जणू सांगून टाकले. भुगोलात नसलेल्या देशांची माहिती तुमच्या दौर्‍यांमुळे मिळाली. ज्या उत्तर प्रदेशमधून तुम्ही निवडणून आलात त्याच उत्तर प्रदेशच्या अयोध्येत तुम्हाला जायला वेळ मिळाला नाही, असे सांगत त्यांनी नाव न घेता मोदींवर थेट हला चढवला. तुमच्यात होणार नाही, म्हणूनच अयोध्येची आठवण देण्यासाठी तिथे सांडलेल्या रक्ताला अभिवादन करण्यासाठी मी २५ तारखेला येत आहे, असे जाहीर करत त्यांनी सरकारला आव्हानच देऊन टाकले. उद्धव हे सांगत असताना प्रथमच मेळाव्यात जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या जात होत्या.

- Advertisement -

सरकारच्या आजवरच्या निर्णयांचा पोलखोल करताना या निर्णयांनी जनतेचे भले झाले नसल्याचे उद्धव यांनी उघड केले. ५६ इंचाच्या छातीची महती सांगताना उद्धव यांनी मोदींवर टीकेचे आसूड ओढले. जनतेची स्मरणशक्ती कमजोर नाही. तुमचेच स्मरण कमजोर झाले आहे. सत्ता तुम्हाला दिली आहे. तुम्ही सेवक म्हणून बोंबलणार. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेणार आणि तोच देश एका सर्जिकल स्ट्राईकमागे १० सर्जिकल करण्याची धमकी देणार, मग तुमच्या छातीचे करायचे काय? अशी विचारणा त्यांनी केली. अतिरेकी घुसवण्याचे कृत्य तो देश थांबवत नाही. तुमच्या राजकारणाला शेंडा आणि बुडकाही राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. आता पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी सेवक आणि त्यांचे मंत्री, राज्यांचे सेवक तिथे जाणार आहेत. या लाव्याजम्याने प्रचार करणे हाच तुमचा पराभव असल्याचे उद्धव यांनी ऐकवले. इंधन दरवाढीवरही त्यांनी सरकारची खिचाई केली. रविशंकर प्रसाद यांचे नाव घेऊन उद्धव यांनी टीका केली.

राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यायला हवी होती. कर्नाटकला ते जमते मग महाराष्ट्राला का नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आम्ही भाजपवर टीका करतो म्हणून आमची हेटाळणी होते, पण आता संघाने काय केले? सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भाजप सरकारवर टीकाच केली ना, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नोटाबंदी, भूसंपादन विधेयक यासारखे निर्णय घेताना मोदींनी शिवसेनेला विश्वासात घेतले नाही

नोटांबंदी, भूसंपादन विधेयक यासारखे निर्णय घेताना पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेला विश्वासात घेतले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी याधीच स्पष्ट केलेले आहे. नोटबंदीमुळे अनेक लोकांचे जीव गेले, उद्योग कोलमडले, त्याचे काय असा सवाल मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान फेब्रुवारी 2017 मध्ये उपस्थित केला होता. विशेष म्हणजे जीएसटीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र सेनेला विश्वासात घेतले होते, याची आठवण उद्धव यांनी दीड वर्षभरापूर्वी काढली होती.
Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -