घरमुंबईसायकलचे मॉडिफिकेशन करावे तर साखरे काकांनीच!

सायकलचे मॉडिफिकेशन करावे तर साखरे काकांनीच!

Subscribe

एक रिटायर्ड गृहस्थ केवळ आवड म्हणून, पैसे न घेता इतरांना सायकल मॉडिफाय करुन देतात. सायकल ट्रेनमधून नेणे योईस्कर व्हावे म्हणून त्यांनी सायकल साठी एक पिशवी देखील बनवली. या पिशवीमुळे विना लगेज चार्जेस सायकल ट्रेनमधून नेता येणे शक्य आहे.

सायकल…अनेकांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी सायकल चालवलेलीच असते. कुणी लहान असताना, कुणी शाळेत जाताना तर कुणी कॉलेजच्या काळात सायकल वापरलेलीच असते. आता मात्र वाढत्या दुचाक्यांमुळे सायकलचे अस्तित्व नाहीसे होत आहे. आजच्या पिढीमध्ये सायकल चालविणे फक्त बालपणापर्यंतच मर्यादित राहिलंय. कधी कधी आपण हिल स्टेशनला, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वगैरे फिरायला गेलो की आपल्याला वाटतं .. सायकलवरुन एक फेरफटका मारावा!.. पण तेव्हा आपण आपली सायकल सोबत नेऊ शकत नाही. कारण, आपण दूरच्या प्रवासामध्ये ट्रेनने सायकल नेणे थोडे किचकट असते. पण तीच सायकल जर आपल्याला हवी तशी मॉडिफाय आणि असेंबल करुन मिळाली तर? आपण अगदी सहजपणे आपल्याला हवे तिथे सायकल नेऊ शकतो.. आणि ते सुद्धा कुठल्याही प्रकारचे लगेज चार्जेस न भरता!

sakhare kaka
विजयकुमार साखरे (साखरे काका)

आज अशाच एका व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगणार आहे, जे सायकल मॉडिफाय करुन देण्यासाठी ओळखले जातात. तसेच त्यांच्याकडे सायकलची एक स्पेशल पिशवी आहे. ज्यात ते आपली सायकल ठेऊन ट्रेनने प्रवास करतात. ते गृहस्थ म्हणजे, डोंबिवलीमधील विजयकुमार साखरे. यांना सर्व ‘साखरे काका’ म्हणून ओळखतात. यांच्याबद्दल सांगायचे म्हणजे, सायकल ही त्यांची आवड किंवा ओळख आहे. काका एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचा छंद जोपासलाय. काका सांगतात सायकलिंग ही त्यांची आवड आहे. सुट्टी असली की, ते नेहमी दूरदूर पर्यंत प्रवास करायचे. त्यांनी अनेकदा मुंबई-पुणे सायकलिंग रेसमध्ये सहभाग सुद्धा घेतला आहे.

- Advertisement -
cycle of sakhare kaka
साखरे काकांची सायकल

सायकलिंगची आवड असल्यामुळे त्यांची रेसिंग सायकल विकत घेण्याची इच्छा होती. मात्र ती परवडण्याजोगी नसल्यामुळे त्यांनी आपल्या जवळील ऑर्डिनरी सायकलमध्ये काही बदल करायला सुरुवात केली. एक-एक करत त्यांनी त्यांच्या सायकलमध्ये अनेक मॉडिफिकेशन्स केले. त्यांचे हे मॉडिफिकेशन्स बघून अनेकांनी त्यांच्याकडून आपापल्या सायकली मॉडिफाय करुन घेतल्या. ऑर्डिनरी सायकलचे गिअर बदलून २१ गियरची सायकल, सायकलला पॉवर ब्रेक/ डिस्क ब्रेक बसविणे, एका सायकलला दुसरी सायकल जोडून डबल सायकल बनवणे, असे अनेक वेगवेगळे मॉडिफिकेशन्स त्यांनी केले.

डबल सायकल तयार करतानाचा किस्सा सांगताना साखरे काका म्हणाले, २०१३ मध्ये नर्मदा परिक्रमा केली होती. त्यांना नर्मदा परिक्रमा त्यांच्या पत्नीसोबत करायची होती. त्यासाठी म्हणून त्यांनी ही डबल सायकल बनवली होती. मात्र मिसेसचे सोबत येणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी एकट्यानीच नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. काका सांगतात ही परिक्रमा पूर्ण करायला त्यांना ४० दिवस लागले.

- Advertisement -

साखरे काकांनी आतापर्यंत जवळपास १५ ते २० सायकली मॉडिफाय केल्या आहेत. अनेकांना छंद म्हणून रेसमध्ये भाग घ्यायचा असतो. पण तेवढ्यासाठी रेसिंगची सायकल घेणे परवडणारे नसते किंवा घेण्याची ऐपत नसते. मग अशांना काकांनी त्यांच्या ऑर्डिनरी सायकलमध्येच नवे गिअर, पॉवर ब्रेक बसवून त्या मॉडिफाय करुन दिल्या. जेणेकरुन त्यांना कमी श्रमात आणि कमी खर्चात रेसमधील टप्पा पार करता यावा. काकांच्या म्हणण्यानुसार, एक ५० हजाराची रेसिंगची सायकल आणि एक ऑर्डिनरी सायकलला मॉडिफाय केल्यास त्यामध्ये जास्त फरक नसतो. काका फक्त मॉडिफाय करुन देत नाहीत तर ते कसे करायचे हे सुद्धा शिकवतात. जेणेकरुन पुढे काही अडचण आल्यास त्या व्यक्तीला त्याची सायकल स्वत: रिपेअर करता यावी. विशेष म्हणजे, काकांनी आतापर्यंत जेवढ्या सायकली मॉडिफाय करुन दिल्या, त्या सर्व विनामूल्य करुन दिल्या आहेत. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी सायकल ट्रेनच्या प्रवासात सहजपणे नेता यावी, यासाठी एक खास बॅगही बनवून घेतली.

cotton pishwi
सायकलसाठी बनवलेली कापडी पिशवी

या बॅगमुळे ते आता सायकल कुठेही सहजपणे ट्रेनमधून नेतात. अगदी पुणे-मुंबईला आणि ते सुद्धा विना लगेज चार्जेस. या बॅगबद्दल काका सांगातात, त्यांना निसर्गरम्य ठिकाणं, पर्वत-टेकड्या या ठिकाणी सायकलिंग करायला जास्त आवडतं. त्यामुळे ते बऱ्याचदा मुंबईपासून दूर अगदी खोपोलीपर्यंत सायकलिंग करत.. पण आता वाढत्या वयोमानामुळे त्यांना जास्त सायकलिंग शक्य होत नाही. तसेच वेळ वाचविण्यासाठी म्हणून ते ट्रेनने पनवेल, लोणावळा, खोपोली, कर्जत या ठिकाणी सायकल घेऊन जातात. तिथे सायकलिंग करून परत ट्रेनने डोंबिवलीला परत येतात. पण या दरम्यान त्यांना ट्रेनमध्ये सायकलचे लगेज चार्जेस भरावे लागतात. ते सांगतात, त्यांना एका बाजूने जातांनाच सायकलचे लगेज चार्जेस २००-२५० रु पडायचे आणि येताना तेवढेच. हे चार्जेस सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नव्हते. म्हणून त्यांनी ही स्पेशल सायकलची पिशवी तयार केली. ज्यात ते सायकलचे पार्टस् वेगळे करुन पिशवीत भरुन विना लगेज चार्जेस नेऊ शकता.

cycle bag with cycle
कापडी पिशवीत ठेवलेली सायकल

ते सांगतात की सायकलचे वजन १२ किलो-१५ किलो असते. जे पिशवीत भरल्यावर तुम्ही अगदी आपल्या सामानाच्या बॅगप्रमाणे प्रवासात ने-आण करु शकता. काका सांगातात की सायकल जशीच्या तशी ट्रेननी नेली तर त्याला लगेज चार्जेस लागतात. मात्र सायकलचे पार्टस् काढून पिशवित नेले तर त्याला काहीच चार्जेस लागत नाहीत. त्यामुळे त्यांनी सायकलला मॉडिफाय करतांना असे काही पार्टस् वापरले. जेणेकरुन अगदी सहज सायकलचे पार्टस् वेगळे करुन पिशवीत भरता येतील आणि हवे तिथे पोहोचल्यावर परत पार्टस् जोडून सायकल वापरता येईल. विशेष म्हणजे काका मॉडफिकेशन्समध्ये असे पार्टस् वापरतात जे हातानी विनास्पिनर जोडता येतात आणि काढताही येतात. त्यामुळे एखाद्याची सायकल पंक्चर झाली तर सहजपणे त्याला टायर काढून दुरुस्तीला नेता येऊ शकते. तुम्हालाही निसर्गरम्य ठिकाणी, मुंबईपासून दूर जाऊन सायकलिंग करायची इच्छा असेल आणि ट्रेनमधून सायकल कशी न्यायची हा प्रश्न असेल तर तुम्ही सुध्दा ही आयडिया वापरु शकता आणि तुमची इच्छा पूर्ण करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -