घरमुंबईदादरच्या फेरीवाल्यांनी रेषाच बदलली

दादरच्या फेरीवाल्यांनी रेषाच बदलली

Subscribe

कोर्टाच्यामुळे मुंबई महापालिकेने दादर रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करणारी रेषा मारली आहे. मात्र फेरीवाल्यांनी चक्क ही लक्ष्मण रेषाच फुसून टाकली आहे. शंभर आणि सव्वाशे मीटर अंतरावर दोन रेषा मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची सीमारेषा कोणती असा प्रश्न आता खुद्द महापालिकेच्या अधिकार्‍यांना पडला आहे. या रेषा बदलण्यासाठी फेरीवाले आणि अधिकार्‍यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.

मुंबईत रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी आहे. याशिवाय महापालिका मंडई, रुग्णालय, धार्मिक स्थळ, शाळा व कॉलेजसही इतर भागांंमध्ये १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांनाही बंदी आहे. मनसेने याबाबत महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर दादर रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर रेषा मारून त्यातील आतील बाजूस रस्त्यावर व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्यात येते. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजुस रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग आदींवर अशाप्रकारे रेषा मारण्यात आल्या आहेत. परंतु या तिन्ही रस्त्यांवरील दीडशे मीटरच्या आतील बाजुस १०० मीटर आणि १२५ मीटर अंतरावर दोन रेषा मारण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १०० आणि १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांकडून पैसे घेत ही रेषा अधिकार्‍यांच्या संगनमतांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून मारण्यात आल्या आहेत. सुरुवातीला १०० मीटर परिसरात ही रेषा मारण्यात आली होती. परंतु यातील काही फेरीवाल्यांनी पैसे न दिल्यामुळे ही रेषा १२५ मीटरच्या अंतरावर पुन्हा मारण्यात आली. यामध्ये जी-उत्तर विभागाच्या परवाना विभागाचे वरिष्ठ अधिक्षकाचा प्रमुख हात असल्याचे बोलले जात आहे.

दीडशे मीटर परिसरात महापालिकेच्या मारलेल्या मुख्य रेषेऐवजी अन्य दोन रेषा मारल्यामुळे या विभागातील अधिकार्‍यांनी परवाना विभागाचे अधिकारी व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. परंतु दिघावकर यांनी १५०मीटरवरील रेषा हीच अंतिम मानून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिल्या. मात्र, त्यानंतर परवाना विभागाच्या अधिकार्‍यांनी फेरीवाल्यांना हाताशी धरून महापालिकेची मुख्य रेषाच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. पण दिघावकर यांनी त्यानंतरही १५० मीटरची रेषा पुन्हा मारुन उर्वरीत दोन रेषा पुसुुन टाकण्याचे निर्देश अधिकार्‍यांना न दिल्यामुळे नक्की दिघावकर कुणाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

दादरमधील रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्गावर काही फेरीवाल्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये काढून महापालिकेच्या १५० मीटर ऐवजी १२० मीटरवर नवीन रेषा मारली आहे. याबाबत तक्रार केल्यानंतरही रेषा पुसून टाकण्यात आलेल्या नाहीत. पावसाचे कारण देत नवीन पुन्हा रेषा आखल्या जात नाहीत. त्याला परवाना विभागाचे वरिष्ठ अधिक्षकच जबाबदार आहेत.
-दिलीप आवटी, स्थानिक रहिवाशी

फेरीवाल्यांनी कितीही प्रयत्न करून रेषा बदलेली असली तरी आम्हाला आम्ही मारलेली रेषा माहीत आहे. आमची कारवाई ही १५० मीटरच्या रेषेप्रमाणेच केली जाणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी मारलेल्या रेषा पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची रेषा आता पुन्हा आखण्यात येईल. तसेच तिथे फलकही लावला जाईल. मात्र, यापुढे अशाप्रकारची हरकत केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
-किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी-उत्तर विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -