समाजभान जपत ठाण्यात गोविंदा पथकांचा जल्लोष

ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवाला प्रत्येकवर्षी उधाण आलेलं असत. ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये दरवर्षी काहीना काही तरी विक्रम हा ठरलेला असतो. यंदा साधेपणाने दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. मंबईतील गोविंदा पथकांनीही ठाण्यात हजेरी लावली होती.

Thane
dahi handi celebrate in thane by govinda pathak with social message
समाजभान जपत ठाण्यात गोविंदा पथकांचा जल्लोष

नऊ मानवी थरांच्या मनोऱ्याचे विक्रम, गोविंदा पथकावर विक्रमी बक्षिसांची उधळण यामुळे ठाण्याने दहीहंडीला वेगळचं गॅलमर मिळवून दिले. मराठमोळया मातीतला दही हंडी उत्सव ठाण्याने जगभरात पोहचवला. पण यंदा राज्यात उद्भवलेल्या अस्मानी संकटाचे सावट दही हंडी उत्सवावर होते. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळांनी पुढाकार घेतला. ठाण्यात गोविंदा पथकांचा जल्लोष होता. मुंबईतील जय जवान गाेविंदा पथकाने नऊ थरांपर्यंत सलामीचा विक्रम केला. संस्कृती जपण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवाला प्रत्येकवर्षी उधाण आलेलं असत. ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये दरवर्षी काहीना काही तरी विक्रम हा ठरलेला असतो. यंदा साधेपणाने दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. मंबईतील गोविंदा पथकांनीही ठाण्यात हजेरी लावली होती. मात्र नेहमी सारखा गोविंदा पथकांचा इतका जल्लोष दिसून आला नाही. ठाण्यात संकल्प प्रतिष्ठान, संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसे, टेंभीनाका दहीहंडी अशा अनेक लाखमोलाच्या दहीहंड्या लागतात. ठाण्यात नऊ थरांचा जागतिक विक्रम करण्यात आला आहे.

कॅन्सर पीडितांसाठी दोन थरांची हंडी

कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण परिसरात आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणच्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या. पण ठाणे शहरातील दहीहंडी आयोजकांनी पूरपरिस्थितीचं भान ठेऊन उत्सव साजरा करतानाच दहीहंडी सणही साजरा करण्याचं ठरवलं आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांची आनंद दिघे चॅरिटेबल ट्रस्टची जांभळी नाका येथील दही हंंडी रद्द करण्यात आली. कॅन्सर पीडितांसाठी दोन थरांची हंडी ठेवण्यात आली. पूरग्रस्तांसाठी मदत देण्यात येणार आहे.

मनसेकडून पूरग्रस्तांना साडेपाच लाखाची रक्कम वाटप

ठाण्यातील नौपाडा परिसरात मनसेकडून सामाजिक बांधिलकी जपणारी दही हंडी उभारली गेली. मुंबई ठाण्यातील गोविंदा पथकांनी या हंडीसाठी हजेरी लावली. मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने ९ थरांची सलामी दिली. नऊ थरांसाठी ११ लाख पहिले पारितोषिक ठेवण्यात आले होते. पूरग्रस्त ११ कुटूंबियांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे धनादेश असे साडेपाच लाचा धनादेश वाटप करण्यात आले. उर्वरित साडे पाच लाख रूपये गोविंदा पथकांना देण्यात आली. ठाण्यात मनसेकडून संस्कृती जपण्याबरोबरच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. यावेळी मनसे नेते अभिजीत पानसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

टेंभी नाक्याची हंडी फोडण्याचा मान ठाण्याचा राजा मंडळाला

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेली टेंभी नाक्याची दही हंडी पारंपारिक पध्दतीने आणि साध्यापणाने साजरी करण्यात आली. ठाण्याचा राजा या मंडळाच्या गोविंदा पथकाला हंडी फोडण्याचा मान मिळाला. दिघे साहेबांची मानाची हंडी फोडण्याची अनेक वर्षांपासूनची मंडळाची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याने खूपच आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी बोलताना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के म्हणाले की, ‘दिघे साहेब हे दही हंडीचे प्रणेते आहेत. टेंभी नाक्यावरून दही हंडीला महोत्सवाचे स्वरूप मिळाले. यंदा कोल्हापूर सांगली सातारा आणि कोकणात पूर परिस्थिती उद्भवली. त्यात अनेकांचं संसार उघडयावर पडले. त्यामुळे यंदा साधेपणाने ही हंडी साजरी करण्यात आली असून पूरग्रस्तांसाठी मदत दिली जाणार आहे.’

जय जवान गोविंदा पथक

संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टची प्रो गोविंदा रद्द

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे निधन झाल्याने ठाणे वर्तकनगरमधील संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट – प्रो गोविंदा २०१९ उत्सव रद्द करण्यात आला. प्रो गोविंदाच्या १४ संघानी नोंदणी केली होती. त्यामुळे यावर्षीच एक दिवस ठरवून हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. गोविंदा पथकांना मिळालेली पारितोषिकातील काही रक्कमही पूरग्रस्तांसाठी देण्यात आली आहे. ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पेाहचविण्यात येणार आहे, असेही सरनाईक यांनी सांगितले.

शिवसेना आमदार,रवींद्र फाटक यांचा संकल्प दहीकाला उत्सव रघुनाथ नगर येथे आयेाजित करण्यात आला होता. यावर्षी मोठ्या थाटामाटात दहीकाला न करता पारंपारिक आणि सांस्कृतिक वातावरणात दहीहंडी सण साजरा करण्यात आला. या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. तसेच ठाण्यातील हिरानंदानी मेडोज चौक येथे भाजपच्यावतीने दही हंडी उभारण्यात आली. यंदा दही हंडीचे दुसरे वर्षे होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख ५५ हजार रूपये मदत देण्यात आली. तसेच चंदगड तालुक्यातील २५ पूरग्रस्त कुटूंबाची घरे नव्याने बांधून देण्यात येणार आहे असे भाजप माथाडी कामगार सेलचे अध्यक्ष व आयोजक शिवाजी पाटील यांनी सांगितले.