घरमुंबईआयोजकांकडून सुरक्षेचे तीनतेरा

आयोजकांकडून सुरक्षेचे तीनतेरा

Subscribe

न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर

मुंबईसह ठाण्यामध्ये उभारलेल्या लहानमोठ्या दहीहंडी आयोजकांनी यावर्षी कोणतेही सुरक्षा नियम पाळले नसल्याचे दिसून आले. हंडी लावलेल्या ठिकाणी कुशन लेयर, सेफ्टी बेल्ट, चेस्ट गार्ड व हेल्मेट आयोजकांकडून पुरवणे बंधनकारक असताना यावर्षी तुरळक ठिकाणे वगळता सर्वच ठिकाणी आयोजकांनी न्यायालयाचे आदेशच धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले.

दहीहंडीला क्रीडा प्रकाराचा दर्जा देत न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने 2017 मध्ये दहीहंडीसाठी नियमावली तयार केली होती. यामध्ये दहीहंडीखाली मॅट, मॅट्रेससारख्या सुविधा, सर्व गोविंदाना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट तसेच चेस्ट गार्ड अशी सुरक्षिततेची सर्व साहित्य आयोजकांनी उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु मुंबईसह ठाण्यामधील अनेक ठिकाणी न्यायालयाचे हे आदेश सर्रासपणे पायदळी तुडवल्याचे पाहायला मिळाले. तुरळक आयोजक वगळता बहुतांश ठिकाणी सुरक्षेची कोणतीच सुविधा पुरवण्यात आली नसल्याचे शनिवारी दिसून आले. ठाण्यातील दहीहंडीचे मोठे आयोजक असलेले शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान, भाजपचे नेते शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानतर्फे लावलेली दहीहंडी, दादरमधील मानाची समजली जाणारी आयडीयल दहीहंडी, चेंबूरमधील मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे यांची दहीहंडी या मोठ्या दहीहंडीमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे अनेक लहान मोठ्या आयोजकांकडूनही न्यायालयाच्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी आढळून आले.

- Advertisement -

14 वर्षाखालील गोविंदाचा समावेश
दहीहंडी पथकामध्ये 14 वर्षाखालील मुलांचा समावेश नसावा असा नियम सरकारने केला असला तरी गोविंदा पथकांमध्ये सर्रास 14 वर्षाखालील मुलांचा समावेश होता. तसेच सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या गोविंदामध्ये एका 14 वर्षाखालील मुलाचा समावेश आहे.

ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान, स्वामी प्रतिष्ठान, कर्णबाळा दुनबळे व आयडीयल या आयोजकांनी सुविधा न पुरवल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे. तसेच गोविंदा पथकांचा विमा न काढल्याप्रकरणी दहीहंडी समन्वय समितीविरोधात याचिका दाखल करणार आहे.
– अ‍ॅड. स्वाती पाटील,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -