घरमुंबईअल्बममध्ये नाचणार्‍यांनी मला शिकवू नये

अल्बममध्ये नाचणार्‍यांनी मला शिकवू नये

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध हा एककलमी कार्यक्रम राज यांच्या सभेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रत्येक प्रचारसभेत राज ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. ‘रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्‍याच्या लग्नात नाचतय खुळं’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. त्यावर राज यांनी ‘द रिव्हर अँथम’ या अल्बममध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका साकारली होती त्याचा आधार घेत अल्बममध्ये नाचणार्‍यांनी मला शिकवू नये, असा टोला एका खासगी वृत्तवाहिनीवर मुलाखत करताना लगावला.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून खडाजंगी सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असेही म्हणून राज यांचा समाचार घेतला होता.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे हे त्यांच्या सभांमधून करत आहेत. राज ठाकरेंनी भाजपला केलेल्या टार्गेटमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला धारेवर धरलं आहे.

वाकयुद्ध रंगत जाणार
मागच्या वेळीदेखील ‘राज ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीहून येते, राज हे बारामतीचे पोपट आहेत’ असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता, यावर राज यांनीही मुख्यमंत्र्यांवर ‘हवा गेलेला फुगा’ अशारितीने टीका केली होती. त्यानंतर मनसे पहिल्यांदा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ होती त्यानंतर ‘मतदार नसलेली सेना’ झाली आणि आता ‘उमेदवार नसलेली सेना’ म्हणजे ‘उनसे’ झाली आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला लगावला. यावर मनसेकडूनही बीजेपी म्हणजे ‘भारतीय जुमला पार्टी’, असे प्रत्युत्तर करण्यात आले. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई, ठाणे दौर्‍यावर असणार आहेत, त्यामुळे आगामी काळात मनसे-भाजप यांच्यातील वाकयुद्ध रंगत जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -