घरमुंबईभिवंडीत पोलीसावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोरांना आठ तासांमध्ये अटक

भिवंडीत पोलीसावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोरांना आठ तासांमध्ये अटक

Subscribe

एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे राज्यासह देशभरात या महामारीत साजरे होणारे सण यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातच शनिवारी देशभरात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण साजरा होत असतानाच शहरातील भंडारी कंपाउंड चौक येथे तरुणांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच धारदार कटरने हल्ला झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. जखमी पोलिसाला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेवून भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे भोईवाडा पोलिसांनी रात्रभर आरोपींचा शोध घेऊन अखेर अवघ्या आठ तासांमध्ये पहाटे ठाणे (येऊर ) येथून या दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेचे अधिक वृत्त असे की भोईवाडा पोलीस ठाण्यात नेमणूकीतील पोलीस हवालदार प्रफुल्ल जाऊ दळवी(५२) यांना मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सणानिमित्त भंडारी चौक येथे होमगार्ड राजेश सावंत यांच्यासोबत फिक्स पॉईंट ड्युटी नेमलेली होती. रात्री आठच्या सुमारास येथील नझराणा मेडिकल जवळ असलेल्या किराणा दुकानाच्या बाजूला भंडारी चौक येथे दोन इसम हे एका इसमास मारहाण करीत होते. त्याची माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार प्रफुल्ल दळवी हे सहकारी होमगार्ड सावंत यांच्यासोबत जाऊन तरुणांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवू लागले. या दरम्यान मारहाण करणार्‍या एका अनोळखी इसमांना पोलीस हवालदार दळवी यांना जोराचा धक्का दिला आणि दुसऱ्या इसमाने कोणत्यातरी शस्त्राने त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर,डाव्या बाजूस खांद्यावर तसेच डाव्या कानावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले व दोघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोह. दळवी यांना येथील नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ ऑरेंज रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून ऐन बकरी ईदच्या दिवशी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. या हल्ल्याच्या घटनेचा भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच एपीआय अजय गंगावणे हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होवून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून हल्लेखोरांचे मोबाईल नंबर प्राप्त केले व त्या आधारे मोबाईलचे सीडीआर तपासून या हल्ल्यातील हल्लेखोर रवींद्र धनाजी भोसले (२०) आणि लखन अंकुश जाधव (२०) दोघेही रा.देवजी नगर,नारपोली या दोघांनाही मोठ्या शिताफीने अवघ्या आठ तासांत येऊर ,ठाणे येथून अटक केली आहे.या दोघाांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ ऑगष्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हल्ल्याची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी एका इसमासोबत झालेल्या भांडणादरम्यान भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पोलीस हवलदार दळवी यांच्यावर कटरने वार करून जखमी केले असल्याची कबुली दिली आहे.आरोपींना अटक करण्यासाठी उपायुक्त राजकुमार शिंदे याांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजय गंगावणे,पोलीस उपनिरीक्षक जे.पी.जाधव व तपास पथकाचे कर्मचारी पोना. अरविंद गोरले,पोह. देविदास वाघेरे, दिनकर सावंत, मनोज भवर, अतिष शिंगाडी,महिला पोशी.सुवर्णा वासले यांनी विशेष परिश्रम घेतले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -