वीज पडून दाम्पत्याचा मृत्यू

17 injured after lightning in mahad

विजेच्या गडगटासह झालेल्या जोरदार पावसात घरावर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापूरजवळील धामणवाडी येथे घडली आहे.

सोमवारी पहाटे बदलापूर परिसरात विजेच्या गडगटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी घरावर वीज पडल्याने कोंडेश्वर जवळील धामणवाडी येथे राहणार्‍या मोरेश्वर कडाळी व त्यांची पत्नी बुधी कडाळी यांचा जागीच मृत्यू झाला. हे पती-पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून घरातील काम करत होते.त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. बाजूच्या घरात झोपलेला त्यांचा ८ वर्षांचा मुलगा व ६ वर्षांची मुलगी सकाळी आईवडिलांना उठविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून या मुलांनी त्यांच्या काका-काकूंना बोलावले. तेव्हा हा प्रकार समोर आला.

या पती-पत्नीचे मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, आईवडिलांच्या मृत्यूमुळे त्यांची दोन लहान मुले पोरकी झाली असल्याने तहसीलदार कार्यालयामार्फत लवकरात लवकर पंचनामे करून या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण मुंडे तसेच आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी केली आहे.