घरमुंबईहृदयविकारामुळे मृत्यू होण्याचं वाढतं प्रमाण, राज्यात ४ वर्षात ३ लाखांहून अधिक मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचं वाढतं प्रमाण, राज्यात ४ वर्षात ३ लाखांहून अधिक मृत्यू

Subscribe

जगभर संसर्गजन्य आजारांनी दगावणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. मात्र, हृदयरोगाने दगावणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या जगण्यात हृदयाला जपा असा सल्ला वारंवार डॉक्टरांकडून दिला जातो. हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हृदयाच्या आजारांनी ग्रासले आहे. जगभर संसर्गजन्य आजारांनी दगावणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. मात्र, हृदयरोगाने दगावणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. २०१५ च्या आकडेवारीनुसार, मुंबईत दर दिवशी ४० नागरिकांचा हृदयविकाराने मृत्यु होतो आणि हा आकडा आजच्या घडीला वाढल्याची चिंता आरोग्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

महाराष्टात ४ वर्षातील मृतांचा आकडा?

गेल्या ४ वर्षात महाराष्ट्रात हृदयाच्या विकारांनी तब्बल ३ लाख ७४ हजार ३२० जणांचा मृत्यू झाला आहे. २०१६ या वर्षी हृदयविकारांमुळे ६८ हजार ८७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. हृदयविकाराच्या आजारांचं प्रमाण ३१.५ टक्के एवढं आहे. जगाच्या पाठीवर दर ३३ सेकंदांत एकाला हृदयविकाराचा झटका येतो. असा झटका आलेल्या पाच टक्के जणांचा ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू ओढावतो. यामध्ये हार्टअॅटॅक, ब्लडप्रेशर शिवाय हृदयाची वॉल खराब होणं अशा कारणांमुळे मृत्यू होत आहे. जगभरात दगावणाऱ्या शंभर व्यक्तींपैकी किमान २५ मृत्यू केवळ हृदयविकारांनी होतात. आशिया खंडातील देशांमध्ये हे प्रमाण ३० टक्क्यांच्यावर गेल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. त्याखालोखाल संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण आहे. संसर्गामुळे २०१२ ते २०१६ या चार वर्षांत १ लाख ४४ हजार ५५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्याचं प्रमाण १४.२ टक्के एवढं आहे.

- Advertisement -

हृदयविकार आनुवंशिक

हल्ली लहान वयात ही हृदयापासून होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढतं आहे. खरंतर, लोक वयाची चाळिशी उलटून गेल्यानंतरच हृदयाची काळजी घ्यायला सुरुवात करतात. वास्तविक पाहता हृदयरोगाची सुरुवात साधारणपणे १० ते १२ व्या वर्षापासूनच होत असते. याच वयापासून हृदयाच्या रक्तवाहिन्यात चरबी तयार होण्यास सुरुवात होते. ज्यांच्या घरात हृदयविकार आनुवंशिक आहे त्यांनी लहान वयातच आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या वयातच वजनावर नियंत्रण ठेवणारा आहार योग्य असतो.

काय आहे हृदयविकार ?

हृदयविकार हा Microvascular disorder या आजाराचा एक भाग आहे. हा विकार दुरुस्त करत असताना फक्त हृदयाचा नाही, तर सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. हा आजार आनुवंशिक असला तरीही चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे खूप कमी वयातही उद्भवू शकतो. आहार आणि हृदयविकारासाठी कारणीभूत असणारे जनुक (Genes) याचा जवळचा संबंध आहे म्हणून आहारावर योग्य नियंत्रण हा हृदयविकार टाळण्यासाठीचा महत्त्वाचा उपाय आहे.

याविषयी शीव हॉस्पिटलमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अजय महाजन यांनी सांगितलं की, ” हल्ली लोकांची जेवणपद्धती बदलली आहे. त्यासोबत वाढत्या कामाचा ताण या सर्वामुळे आधी डायबिटीस होतो. त्यानंतर डायबिटीसमुळे हृदयाच्या संबंधित विकार जडतात. मग, कोलेस्ट्रॉल वाढतो. वजन वाढतं. त्यातून धुम्रपान, मद्यपान या सवयी हृदयविकार वाढवण्यासाठी पूरक असतात. “

- Advertisement -

दररोज ३ ते ४ हृदयाचा झटका आल्याचे रुग्ण दाखल

शीव हॉस्पिटलच्या ओपीडीत दिवसाला किमान १० ते १२ रुग्ण हृदयविकारांनी त्रस्त असलेले दाखल होतात. शिवाय, किमान ४ रुग्ण हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे दाखल होतात. त्यामुळे लोकांनी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वजन नियंत्रण ठेवलं पाहिजे. पालेभाज्या खाणं, मांसाहार टाळणं, दररोज व्यायाम करणं अशा गोष्टी केल्या पाहिजेत असा सल्ला ही डॉ. महाजन देतात.

हृदयविकार टाळण्यासाठी काय कराल ?

आहारावर नियंत्रणाशिवाय लहान वयामध्ये धावणे, सायकल चालवणे, मैदानी खेळ खेळणे जास्त उपयुक्त ठरते. लहान मुलांमध्ये डबाबंद पदार्थ, फास्ट फूड खाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा पदार्थांपासून मुलांना दूर ठेवणे आवश्यक ठरते.

” गेल्या अनेक वर्षांपासून हृदय आणि त्या संबंधित असलेल्या विकारांमध्ये भर पडली आहे. आधी कुठल्याही संसर्गामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्यू व्हायचे. पण, आता हृदयाच्या विकारांचं प्रमाण वाढलं आहे. हार्ट फेल्युअर, उच्चरक्तदाब किंवा अनेक हृदयासंबंधित आजार यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहेत. ” – डॉ. तानाजी माने, उपमुख्यनिबंधक, महाराष्ट्र राज्य

संसर्गामुळे १ लाख मृत्यू

मृत्यूंच्या सर्वात महत्त्वाच्या कारणांमध्ये संसर्गामुळे होण्याऱ्या मृत्यूंचं प्रमाण जास्त असून हे कारण दुसऱ्या क्रमाकांवर आहे. टीबी, न्यूमोनिया, स्वाईन फ्लू, खोकला, दम्याचे विकार, डिप्थेरिया या संसर्गजन्य आजारांमुळे आजारी पडून दगावण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यानुसार, २०१२ ते २०१६ या चार वर्षात १ लाख ४४ हजार ५५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल, श्वसनविकाराच्या त्रासामुळे १ लाख १६ हजार ४२८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

” संसर्गामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण आधी फार होतं. पण, आता त्या तुलनेत ते कमी झालं आहे. टीबीचा संसर्ग, दमा असताना आणखी इतर आजार असतील तर त्यातून संसर्ग होतो. असे अनेक संसर्ग होतात. त्यामुळे ते आणखी बळावणार नाही यासाठी तात्काळ उपचार घेतले पाहिजेत.” – डॉ. प्रकाश भोई, सहसंचालक, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -