घरमुंबईनिवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर पालिकेला जाग

निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर पालिकेला जाग

Subscribe

बॅनर्स काढण्याच्या कामात दिरंगाई केल्याने दमछाक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कार्यक्रमाचा धडाका लावला होता. त्यासाठी ठीकठिकाणी कामांचे श्रेय घेणारे बॅनरयुद्ध रंगले होते. ही प्रसिद्धीची बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात होत असताना पालिका प्रशासकीय अधिकारी गप्प होते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते याचे भान असतानाही प्रशासकीय अधिकार्‍यांनी याकडे कानाडोळा केला होता. आता आचारसंहिता लागताच हे बॅनर्स काढण्यासाठी अधिकार्‍यांची धांदल उडाली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या घेर्‍यात आपण यायला नको म्हणून मनपा अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या बॅनर काढण्याचा सपाटा लावला आहे. हेच काम जर अगोदर त्यांनी केले असते तर आता धावपळ झाली नसती.

आचारसंहिता लागू होताच पनवेलसह नवी मुंबई परिसरामधील अनधिकृत बॅनर हटविण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरू केले आहे. मंगळवारी दिवसभरामध्ये शेकडो होर्डिंग उतरविण्यात आले आहेत, परंतु सायंकाळपर्यंत उद्घाटन व भूमिपूजनाच्या पाट्या झाकण्यात आल्या नव्हत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये उद्घाटन व भूमिपूजनाचा धडाका सुरू होता. प्रत्येक नोडमध्ये महापालिकेने व खासदार, आमदारांच्या निधीमधून केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात येत होते. यातूनच दोन पक्ष एकमेकांना भिडल्याचेही नागरिकांनी पाहिले.

- Advertisement -

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 1200 पेक्षा जास्त होर्डिंग लावण्यात आले होते. महापालिका प्रशासनानेही अनेक ठिकाणी माहिती फलक लावले होते. होर्डिंगबाजीमुळे शहर विद्रूप दिसू लागले होते. रविवारी आचारसंहिता जाहीर होताच सोमवारी पहाटेच प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रामधील होर्डिंग हटविण्यास सुरुवात झाली. दिवसभर मुख्य रस्ते, चौक व महत्त्वाच्या ठिकाणी असलेले अधिकृत व अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले. वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवरील होर्डिंग मात्र सायंकाळनंतरही जैसे थे होते. पनवेल महापालिकेनेही सकाळीच होर्डिंग हटविण्याची मोहीम सुरू केली. दिवसभर कर्मचार्‍यांची धावपळ सुरू होती. शहरातील बॅनर गायब झाल्यामुळे दक्ष नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेक ठिकाणी होर्डिंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला होता. आचारसंहितेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांचा किंवा नेत्यांचा प्रचार होईल असे बॅनर लावू नयेत. उद्घाटन व भूमिपूजनाच्या पाट्यांवरही कागद लावणे आवश्यक आहे; परंतु पहिल्या दिवशी शहरातील कोणत्याच पाट्या झाकण्यात आलेल्या नाहीत. वाशीतील शिवाजी चौक, महापालिका रुग्णालय, मार्केट, वाचनालय, उद्यान येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तेथे दर्शनी भागामध्ये उद्घाटन व भूमिपूजनाचे फलक बसविण्यात आले आहेत. हे सर्व फलक तत्काळ हटविण्यात यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे, परंतु अद्याप प्रशासनाने फलक झाकण्याची कार्यवाही सुरू केलेली नाही.

पनवेल, उरणमध्ये 471 होर्डिंग
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सोमवारी सकाळीच होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. दिवसभरामध्ये तब्बल 425 होर्डिंग हटविण्यात आले. उरणमध्येही 46 होर्डिंग हटविण्यात आले आहेत. दिवसभर कर्मचार्‍यांची धावपळ सुरू होती. सायंकाळनंतरही काही ठिकाणचे होर्डिंग उतरविण्यात आले नव्हते. मंगळवारी शिल्लक राहिलेले सर्व होर्डिंग हटविण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -