बँक खात्यातून दोन लाखांचा अपहार करणार्‍या दिल्लीतील भामट्यास अटक

Mumbai
cyber crime
सायबर क्राइम

इंग्लंडच्या हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर असताना एका इंजिनिअरला मनी लाँड्रीगच्या गुन्ह्यांत अटक करण्याची धमकी देत डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून दोन लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच दिल्लीतील एका भामट्याला सायबर सेल पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. आदित्य गजेंद्र कोहली असे या भामट्याचे नाव असून त्याच्या अटकेने अशाच अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने मंगळवार 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार ऑटोमोटिव्ह इंजिनिअर असून इंग्लंडच्या एका खासगी कंपनीत सिस्टीम सेफ्टी इंजिनिअर या पदावर काम करीत होता. तो अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहत असून तिथेच त्याचे एका बँकेत वडिलांसोबत संयुक्त बचत खाते आहेत. 19 नोव्हेंबरला त्याने कंपनीचा राजीनामा देऊन भारतात परत येण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्याच्या विदेशातील सॅलेरी बँक खात्यातील सर्व रक्कम त्याने त्याच्या वडिलांसोबत असलेल्या संयुक्त बँक खात्यात वळविली होती. 27 नोव्हेंबरला तो हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्याला जॉन पारकर नावाच्या एका व्यक्तीने फोन करून तो इंग्लंडच्या गृहविभागातील अधिकारी आहे, त्याच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध कारवाईची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या कार्डचा क्रमांक, युजर नेम, ओटीपी क्रमांक घेतला. या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी त्याने त्याच्याकडे दोन हजार पोैंडची मागणीही केली होती. त्यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यातून दोन लाख रुपयांचे विदेशी चलन दुसर्‍या बँक खात्यात वळविण्यात आले होते.

हा प्रकार उघडकीस येताच त्याने विमानतळावरील अधिकार्‍यांना ही माहिती सांगितली, यावेळी त्यांच्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार आली नाही असे समजले. मुंबईत आल्यानंतर त्याने सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात भामट्याविरुद्ध तक्रार केली होती. पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तांत्रिक माहितीवरुन सायबर सेल पोलिसांचे एक विशेष पथक दिल्लीत गेले होते, या पथकाने बुधवारी दिल्लीतील आदित्य कोहली याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. चौकशीत त्याने ही रक्कम संजयकुमार वस्त या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केली होती. मात्र संजयकुमारचा या गुन्ह्यांत अद्याप सहभाग उघडकीस आला नाही, त्यामुळे जबानी नोंदवून त्याला सोडून देण्यात आले. आदित्य हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याने अशाच प्रकारे अन्य काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here