घरमुंबईसाईनाथ शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी

साईनाथ शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी

Subscribe

शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार्‍या अतिरिक्त रकमेवर डोळा ठेऊन घाटकोपरमधील साईनाथ शिक्षण संस्थेच्या संचालकाने संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे मानसिक व आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली. संचालकांच्या अश्लील व असभ्य भाषेमुळे त्रस्त झाल्याने 9 एप्रिलला एक शिक्षिका बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. संस्थाचालकांच्या अरेरावीला कायमचा चाप बसावा व शिक्षकांमधील दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी संस्थेच्या शाळेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी शिक्षक भारतीकडून शिक्षण निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.

साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील महिला शिक्षकांनी सततच्या अश्लील व असभ्य भाषा वापरण्याच्या वर्तनाला कंटाळून संस्थाचालक नामदेव घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. संस्थाचालकावर कठोर कारवाई व्हावी यासाठी 12 एप्रिलला शिक्षक भारतीने घाटकोपर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांनी घाडगे यांच्यावर कारवाई केली, परंतु या घटनेमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडले असून, शिक्षक दहशतीखाली वावरत आहेत. तसेच विद्यार्थी आणि पालकांचीही आर्थिक लुबाडणूक होत आहे. त्यामुळे साईनाथ शिक्षण संस्थेच्या शाळेवर प्रशासक नेमावा. तसेच याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी विनंती शिक्षक भारतीचे प्रमुख कपील पाटील यांनी शिक्षण निरीक्षकांकडे केली आहे.

- Advertisement -

संस्थाचालकांपासून शिक्षकांना असलेला धोका लक्षात घेऊन आणि त्यांच्या विकृत शेरेबाजीला प्रतिबंध करण्यासाठी शाळेच्या आवारात घाडगे यांना येण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी शिफारस प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी शिक्षण निरीक्षकांना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -