मोनोरेल स्थानकांचे बारसे लवकरच ?

त्रिदस्यीय समितीचा अहवाल अपेक्षित

Mumbai

मोनोरेल स्थानकाच्या बारशासाठी अनेक राजकीय पक्षांकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मागणी होत आहे. पण राजकीय पक्षांकडून होत असलेल्या असलेल्या मागणीवर आता मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर होणे अपेक्षित आहे. एकूण चार स्थानकांचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. आजही मोनोरेलच्या दादर पूर्व स्थानकाला विठ्ठल मंदिर हे नाव द्यावे, अशी मागिणी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज त्यांनी मोनोरेल स्थानकात वारकर्‍यांसोबत आंदोलन करत प्रातिनिधीक म्हणून मोनोरेलच्या डब्यात विठ्ठल मंदिर स्टेशन या नावे स्टिकरही लावले आहेत.

मोनोरेलच्या दादर पूर्व स्थानकाला विठ्ठल मंदिर हे नाव द्यावे यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र एमएमआरडीएने आमच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असे वाघमारे म्हणाले. संपूर्ण स्थानकाचे नाव बदलणे शक्य नसल्यास किमान दादर पूर्व नाव तसेच ठेवून त्या खालोखाल विठ्ठल मंदिर नाव द्यावे असेही त्यांनी सुचवले आहे. नाव बदलण्याच्या मागणीकडे गांभीर्याने एमएमआरडीएने लक्ष घालावे अन्यथा विठ्ठल मंदिर परिसरात येणार्‍या तीन लाख ते चार लाख भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आता मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचा काय अहवाल जातो हे महत्वाचे ठरणार आहे. मोनोरेलच्या स्थानकांचे नाव बदलण्यासाठी तीन सदस्यीय समितीत तीन मंत्र्यांचा समावेश आहे. नाव बदलण्याची मागणी असलेली सगळी स्थानके ही मोनोरेलच्या दुसर्‍या टप्प्यातील म्हणजे वडाळा डेपो ते महालक्ष्मी या टप्प्यातील स्थानके आहेत.

आतापर्यंत जीटीबी नगर, वडाळा ब्रीज, अँटॉप हिल आणि दादर पूर्व या स्थानकांचे नाव बदलावे यासाठीची मागणी राजकीय पक्षाकडून करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून मोनोरेल स्थानकांची नावे बदलण्याची मागणी आलेली आहे. जीटीबी नगर स्थानकासाठी त्रिमुर्ती शिव असे नाव देण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. तर स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी या स्थानकाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा करूपय्या देवेंद्र यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. वडाळा ब्रिज मोनोरेल स्टेशनसाठी नाना फडणवीस यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दादर पूर्व स्थानकाला विठ्ठल मंदिर असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.