घरमुंबई'सीबीडी' पोलीस ठाण्याला पोलीस उपायुक्तांचा दणका

‘सीबीडी’ पोलीस ठाण्याला पोलीस उपायुक्तांचा दणका

Subscribe

नवी मुंबईतील एका तरुणाचा गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या सीबीडी पोलीस ठाण्याला पोलीस उपायुक्तांनी चांगलाच दणका दिला असल्याचे समोर आले आहे.

एका तरुणाची फसवणूक झालेली असतानाही सीबीडी पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने पोलीस उपायुक्तांने त्यांना दणका दिला आहे. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर फसवणूक झालेल्या तरुणाला सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यात यश आले आहे. या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून फसवणूक करणाऱ्या कंपनीबरोबर स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याची चर्चा तरुणांमध्ये सुरु झाली आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन यावर स्थानिक पोलिसांना विचारणा करण्यात येईल असे यावेळी पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले आहे.

तीन महिन्यानंतर अखेर झाला फसवणुकीचा गुन्हा दाखल

हर्षद शैलेश पवार (२१) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून हा तुर्भे येथे राहतो. हर्षदला कामाची गरज असल्याने त्याने वाशीत झालेल्या एका नोकरी मेळाव्यात धाव घेतली होती. त्याठिकाणी त्याची ‘क्रेसीट मल्टी सर्व्हिस’ या कंपनीशी ओळख झाली. ही कंपनी विमानतळावर ग्राउंड स्टाफवर कामाला लावणारी असल्याने या कंपनीशी हर्षदने संपर्क साधला. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी हर्षदने या कंपनीच्या सीबीडी मधील कार्यालयात जाऊन कंपनीच्या संचालिका रिद्धी माणिकचंद जैशवाल यांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी कामाला लावतो सांगून तसा करार करून हर्षद जवळून १ लाख ३५ हजार रुपये घेतले होते. यानंतर कामासाठी हर्षदने पाठपुरावा केला असता जैशवाल यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे समोर आले.

- Advertisement -

त्यानंतर कामासंबंधी विचारणा करण्यासाठी डिसेंबरमध्ये हर्षदने जैशवाल यांच्या कार्यालयात धाव घेतली असता त्या ठिकाणी कार्यालयच बंद झाले असल्याचे त्याला दिसून आले. यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याला कळून आले. यावर त्याने सीबीडी पोलीस ठाणे गाठले असता त्या ठिकाणी त्याला सदर प्रकरण हे दिवाणी असल्याने तुम्ही थेट न्यायालयात दाद मागा असे सांगण्यात आले. यावरुन पोलीस आपली दिशाभूल करत असल्याचे लक्षात येताच हर्षदने मनसेच्या महिला उपशहरअध्यक्ष डॉ.आरती धुमाळ यांची भेट घेत त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला. धुमाळ यांनाही स्थानिक पोलीस ठाण्यात तोच प्रत्यय आल्याने त्यांनी या प्रकरणी थेट उपायुक्त सुधाकर पठारे यांची भेट घेतली. या प्रकरणी त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत क्राईमचे तुषार दोषी यांच्याकडे धुमाळ यांना पाठवले. दोषी यांनी सीबीडी पोलिसांना फसवणूक प्रकरण दाखल करून घेण्याचे आदेश दिले असता अखेर तीन महिन्यांनी गुरुवारी सीबीडी पोलीस ठाण्यात क्रेसीट मल्टी सर्व्हिस या कंपनीच्या संचालिका रिद्धी माणिकचंद जैशवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका तरुणाची फसवणूक झालेली असतानाही सीबीडी पोलिसांकडून त्यांची दखल घेण्यात येत नव्हती. तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागा असे सांगून पोलीस वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याने या प्रकरणी अखेर वरिष्ठ पोलिसांकडे जाऊन दाद मागावी लागली. त्यानंतर तरुणांची फसवणूक करणाऱ्या रिद्धी माणिकचंद जैशवाल या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला. ही महिला आजही राजरोसपणे वाशीत आपले दुकान मांडून बसली असून कारवाई झाली तर असे अनेक प्रकरणे उघडकीस येऊ शकतात.  – डॉ.आरती धुमाळ – महिला उपशहरअध्यक्ष,मनसे

- Advertisement -

ज्या वेळी सदर प्रकरण माझ्याकडे आले त्यावेळी मी तत्काळ दखल घेत त्यावर कारवाई करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येईल.  – सुधाकर पठारे, उपायुक्त,नवी मुंबई पोलीस आयुक्त


हेही वाचा – शहिदांच्या नावावर फसवणूक करण्याऱ्या वेबसाईट्सपासून सावधान!

हेही वाचा – बनावट स्थगिती आदेश बनवून न्यायालयाची फसवणूक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -