घरमुंबईराजहट्ट आणि बालहट्टासाठी सुधीर नाईक पुन्हा पालिकेत

राजहट्ट आणि बालहट्टासाठी सुधीर नाईक पुन्हा पालिकेत

Subscribe

पशू पक्षी संग्रालयाची जबाबदारी खांद्यावर

राज्यातील सत्ताधारी युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘राजहट्ट’ आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांचा ‘बालहट्ट’ म्हणून होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी नुकतेच निवृत्त झालेले उपायुक्त सुधीर नाईक यांना लवकरच पुन्हा महापालिकेत विशेष कार्य अधिकारी(ओएसडी) म्हणून रुजू करून घेण्यात येणार आहे. महापालिकेतील एक प्रभावशाली गट सुधीर नाईक यांच्या विरोधात असतानाही त्यांना पुन्हा आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी ’युती’ केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

मुंबई महापालिकेच्या वीरमाता जीजाबाई प्राणी संग्रहालयात पुढील दोन महिन्यांत एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पक्षीसंग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. ५७ एकरातील या पशु-पक्षी संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामात गेली चार वर्षें सुधीर नाईक यांनी खूपच महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा प्रकल्प युवासेना अध्यक्ष आदित्य यांची संकल्पना आहे. या उद्यानात परदेशातून आठ पेंग्विन सुखरुप आणण्याची आणि त्यासाठी यंत्रणा उभारण्याची नाईक यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. तेव्हापासून सुधीर नाईक यांच्यावर ठाकरेंच्या दुसर्‍या पिढीची मर्जी बसली आहे. त्याआधीही नाईक यांनी पालिकेच्या अडचणींच्या काळात उद्धव यांच्याबरोबरच भाजपा नेत्यांसाठी संकटमोचक म्हणून कामगिरी पार पाडली आहे.
नवी मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी जागतिक दर्जाच्या प्राणी संग्रहालयाची निर्मिती करत आहेत. त्यांचे पुत्र आकाश अंबानी याची ती संकल्पना आहे. जागतिक दर्जाच्या या संपूर्ण प्रकल्पाबाबत विलक्षण गोपनीयतेची खबरदारी घेतली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुकेश अंबानी यांनी काँग्रेसच्या मुरली देवरा यांना पाठिंबा देऊनही शिवसेनेने दक्षिण मुंबईची जागा जिंकली. प्राणी-पशु संग्रहालयाच्या निर्मितीतही अंबानी यांच्यापेक्षा सरस कामगिरी करण्यासाठी पालिकेला एका दमदार अधिकार्‍याची गरज आहे.

- Advertisement -

दुसर्‍या बाजूला राज्य सरकार आणि महापालिका यांच्यात आठ दिवसांपूर्वी आणखी एका पशु-पक्षी प्राणीसंग्रहालय निर्मितीचा करार झाला आहे. सरकारला स्व.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे हे जागतिक दर्जाचे स्मारक गोरेगावच्या आरे कॉलनीत उभारायचे आहे. १०० एकर जमिनीचा करार मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद आणि पालिका उपायुक्त सुनील धामणे यांच्या स्वाक्षरीने झाला आहे. त्यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच सेना-भाजपची नेतेमंडळी पालिका सभागृहात उपस्थित होती. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून त्यावर सुमारे सातशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो येत्या चार वर्षांत पूर्ण करण्याचा सत्ताधार्‍यांचा मानस आहे. या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी राज्यसरकार आणि पालिका पातळीबरोबरच पक्षीय गुंता परिचीत असलेला अधिकारी म्हणून सुधीर नाईक यांची वर्णी लागणार आहे. सुधीर नाईकांनी सेवेत असताना आयुक्तांच्या इच्छेनुसार आणि आदेशाखातर प्रशासनात घेतलेले काही निर्णय कर्मचार्‍यांना रुचलेले नाहीत. त्याबद्दल कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे. याचीच ढाल करुन त्यांना पालिकेत पुन्हा येऊ न देण्यासाठी एक प्रभावी गट कार्यरत होता. पण बड्या नेत्यांच्या ’सदिच्छां’मुळे सुधीर नाईक लवकरच ओएसडी म्हणून रुजू होतील.

याबाबत नाईक यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. पदावर असेपर्यंत मी महापालिकेच्या हिताचे निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतले. आता मी निवांत आणि समाधानी आहे’. तर कामगार नेते महाबळ शेट्टी म्हणाले, नाईक एक धडाडीचे अधिकारी होते. पण ते प्रशासन विभागाचे उपायुक्त झाल्यावर त्यांनी कामगार विमा विषयावर आडमुठी भूमिका घेतली. त्यांनी एखाद्या प्रकल्पासाठी परत येण्याबाबत आमची हरकत नाही. मात्र कामगारांच्या प्रश्नात त्यांना घेतले जाऊ नये. शिवसेनेतून आदित्य ठाकरे आणि भाजपातील काही वजनदार नेत्यांसह दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या ‘थिंकटँक’ला सुधीर नाईक यांची उपयुक्तता पटली आहे. नवे पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी यासंदर्भात नाईक यांच्याशी शुक्रवारी सविस्तर चर्चा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -