घरमुंबईराज्यात सरकार आणल्याशिवाय दिल्लीत जाणार नाही

राज्यात सरकार आणल्याशिवाय दिल्लीत जाणार नाही

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत जाणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आपल्या दिल्लीवारीच्या वृत्ताला पूर्णविराम देताना राज्यात जोपर्यंत भाजपाचे सरकार येत नाही, तोपर्यंत आपण महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असा स्पष्ट इरादा शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत व्यक्त केला.
मुंबईत शनिवारी आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी फडणवीस बोलत होते. मी मैदान सोडून पळणार्‍यातला नाही, असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आणण्याचा निर्धार व्यक्त केला. आघाडीचे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही. राजकीय हेराफेरी करून, हाराकिरी करून सरकार सत्तेवर आले आहे.

अशी हाराकिरी करून सत्तेवर आलेले सरकार फार काळ चालणार नाही. जनतेच्या मनात जे असते तेच सरकार तयार होते. त्यामुळेे पुन्हा आपले सरकार आणण्यासाठी आणि अधिक चांगले यश मिळविण्यसाठी आपण टीम म्हणून काम करूया, असे आवाहन फडणवीस यांनी केले. सरकारने भाजप आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. तसा त्रास दिला तर रस्त्यावर उतरून सरकारला जागा दाखवली जाईल. तुमच्या डोक्यात मस्ती जाऊ देऊ नका. तुमचा माज उतरवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली. शिवस्मारकाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचवेळी त्यांनी आघाडी सरकारचे वर्णन तीन चाकी ऑटो असे करून खिल्ली उडवली. ऑटो एका दिशेला धावते. पण सरकारमधील तीन पक्षांची दिशा वेगवेगळी आहे. हे सरकार महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार नाही. या सरकारने गेल्या तीन महिन्यात निर्णयांना स्थगिती देण्याचे काम केले. त्यामुळेे हे प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -