पुढच्या वर्षी लवकर या…

भायखळा, काळाचौकी, भांडुप यासारख्या अनेक ठिकाणी डीजे बंदीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवित फुल व्हॉल्युममध्ये डीजे लावण्यात अनेक मंडळांनी धन्यता मानली.विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरली ती लालबागच्या राजाची मिरवणूक. तब्बल २२ तास ही मिरवणूक चालली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अरबी समुद्रात विशेष ताफ्याच्या माध्यमातून लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

Mumbai
visarjan-002

मुंबई : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर…च्या जयघोषात मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरण रविवारी निरोप दिला. बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भाविकांनी गिरगाव, दादर आणि मुंबईतील इतर चौपाट्या आणि कृत्रिम तलावांत गर्दी केली होती. मुंबई हायकोर्टाने यंदा डीजेला बंदी घातल्याने ढोल ताशांच्या गजरात तर काहींनी पांरपरिक लेझीम तर काहींनी पुणेरी ढोल पथकांच्या उपस्थितीत विसर्जन सोहळे आयोजित केले. भायखळा, काळाचौकी, भांडुप यासारख्या अनेक ठिकाणी डीजे बंदीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवित फुल व्हॉल्युममध्ये डीजे लावण्यात अनेक मंडळांनी धन्यता मानली.विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरली ती लालबागच्या राजाची मिरवणूक. तब्बल २२ तास ही मिरवणूक चालली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अरबी समुद्रात विशेष ताफ्याच्या माध्यमातून लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

गेले अकरा दिवस बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर रविवारी गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका आयोजित करीत त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. फटाक्यांच्या आतिषबाजी गुलालाची उधळण करीत बाप्पाला निरोप देण्याची तयारी सकाळपासून सुरू केली होती. त्यामुळे रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर गुलालाचे गालिचे घातले गेले. ढोलताशांच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यंदा डीजेवर बंदी असल्याने बहुतांश मिरवणुकांमध्ये डीजे नव्हते, मात्र ढोलताशांचा आवाजाचा स्तर डीजेएवढाच होता. चौपाटीवर मात्र आवाजावरील निर्बंधांचे कठोर पालन होत होते. ढोलताशेच नाही तर झांजांचाही आवाज चौपाटीवर नव्हता. काही ठिकाणी मात्र राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून सुरू असलेल्या घोषणांसाठी मोठे स्पीकर वापरण्यात आलेले दिसले. मिरवणुकांमधील या ढोलताशांच्या आवाजावर बेभान नाचणारे गणेशभक्त, अनवाणी पायांनी चालणारे गणेशभक्त, सेल्फीमध्ये मग्न असलेले गणेशभक्त, बाप्पाची प्रचंड ट्रॉली खेचून नेणारे गणेशभक्त, ही दृश्य कॅमेर्‍यामध्ये कैद करणारे गणेशभक्त आणि नंतर समुद्रापाशी पोहोचल्यावर बाप्पाला निरोप देण्याच्या जाणीवेने भावविवश झालेले गणेशभक्त.. एकाच सोहळ्याची ही अनेक रूपे या निमित्ताने दिसली.

हिंदू संघटनेची जनजागृती

पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीच्या मूर्ती वापरा, कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करा असे आवाहन महापालिका आणि राज्य सरकारकडून केले जाते. यामुळे गणेशभक्तांकडून कृत्रिम तलावाचा वापर वाढला आहे. ही कृती धर्मशास्त्राविरुद्ध असल्याने गणेश भक्तांनी मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने दादर शिवाजी पार्क जिमखान्याजवळ करण्यात येत होते.

अपंगाने वाळूपासून साकारली बाप्पाची मूर्ती

अनंत चतुर्दशीला दादर चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. एकीकडे विसर्जन सुरू असताना एका अंध व मूक असलेल्या भक्ताने वाळूपासून बाप्पाचे शिल्प बनवले होते. हे शिल्प चौपाटीवर येणार्‍या गणेश भक्तांना आकर्षित करत होते. गणेश टाणे असे या भक्ताचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा भक्त वाळूपासून शिल्प साकारत आहे. बाप्पावरील असलेली श्रद्धा बघून चौपाटीवर आलेले गणेश भक्त त्यांच्या शिल्पकलेने भावूक झाले होते. भक्त त्यांच्या शिल्पकलेला बघून सेल्फी घेताना दिसत होते. तर काही त्याला आर्थिक मदत करत होते.

विद्यार्थ्यांची पोलिसांना मदत

गणेश विसर्जनासाठी दादर चौपाटीवर सुरक्षा आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी डीजी रुपारेल कॉलेजचे एनएनएसचे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था पोलिसांच्या मदतीला आले होते. विसर्जन करण्याकरिता आलेल्या गणेश भक्तांना मदत म्हणून हे सर्व विद्यार्थी समाजसेवी कार्य करत होते. समुद्रात भरती असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दादर चौपाटीवर स्वयंसेवी संस्थेने मानवी साखळी बनवून गणेश भक्तांना समुद्रात जाण्यापासून रोखत होते. कॉलेज विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीमुळे पोलिसांवरील सुरक्षेचा भर काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

यावर्षी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात घरगुती गणेशमूर्तीमध्ये १४ सप्टेंबर २०१८ एक दिवसाच्या ८२, ४३० तर ४९८ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पाचव्या दिवशी १७ सप्टेंबरला ८३,५७१ घरगुती तर ३००१ घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सातव्या दिवशी १९ सप्टेंबरला घरगुती १७४८२ तसेच सार्वजनिक २३७३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. २३ सप्टेंबरला अकराव्या दिवशी घरगुती ३८५४३ तर सार्वजनिक ७४७५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसात एकूण २ लाख २२ हजार २६ घरगुती गणेशमूर्ती तर १३ हजार ३४७ सार्वजनिक गणपती अशा एकूण २ लाख ३५ हजार ३७३ गणेशमूर्तींचे नैसर्गिक स्त्रोतमध्ये विसर्जन करण्यात आले. तसेच कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक ८४३, घरगुती ३२ हजार ९५९ तर ७८२ गौरींचे अशा एकूण ३४ हजार ५८४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सेवा भावी संस्थेने वेधले लक्ष

२५ वर्षे सेवा देत आहोत. आमच्याकडे ६५० ते ७०० स्वयंसेवक आहेत. विसर्जन करताना गणेश भक्त समुद्रात जातात. विसर्जनासाठी काही अंतरापर्यंत आम्ही भक्तांना जाऊ देतो. काही अंतरापुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही भक्तांना अडवतो. विसर्जन सुखरूप पार पाडण्याची आम्ही काळजी घेतो. मुंबईतला सर्वात मोठा समुद्र किनारा म्हणजेच वरळी ते माहीम साडे तीन किलोमीटरचा पट्टा आहे. यात १२ ते १३ विसर्जनस्थळे आहेत. या सर्व ठिकाणी आमचे जीवरक्षक कार्यरत असतात. आमच्या जीव रक्षकांना पालिकेकडून किंवा सरकारकडून कोणतेही मानधन दिले जात नाही. पालिका, पोलीस, ट्राफिक पोलीस किंवा इतर यंत्रणांकडून मदत न घेता आम्ही निस्वार्थीपणे सेवा देत असतो. गेले २५ वर्षे निस्वार्थीपणे सेवा देत आहोत. आम्ही फक्त गणेश विसर्जनाच्या वेळी सेवा देत नाही, नवरात्र उत्सव, ६ डिसेंबर, ३१ डिसेंबर, छट पूजेवेळी आम्ही आमची सेवा देतो. आम्ही कोणत्याही एका समाजासाठी काम करत नाही. सर्व समाजासाठी काम करतो, असे जलसुरक्षा दलाचे मानसिंग चव्हाण यांनी सांगितले.

सायन तलावासाठी आंदोलनाचा इशारा

सायन येथील ८० वर्षांहून जुना असलेला तलाव बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी गणेशमूर्ती विसर्जित केल्याने प्रदूषण होऊन मासे आणि कासवांचा मृत्यू होतो, असे कारण देण्यात आले. याबाबत पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद उमटले आहे. दहाव्या दिवसाचे गणेश विसर्जन करताना गणेश भक्तांनी तलाव बंद करण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा तलाव बंद केल्यास गणेश विसर्जन करायचे कुठे असा प्रश्न गणेश भक्तांनी उपस्थित केला आहे. ऐतिहासिक असा हा तलाव बंद करू दिला जाणार नाही. गरज पडल्यास त्यासाठी शिवसेनेकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक शाखा प्रमुख अशोक वाघमारे यांनी दिला आहे.

मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ…

लालबाग परळ भागात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पुन्हा एकदा चोरट्यांनी हात साफ केला आहे. मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मौल्यवान साहित्य चोर्‍या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पैशांचे पाकीट,सोन्याच्या चैन,मंगळसूत्र,आणि मोबाईल असे साहित्य चोरीला गेल्याच्या असंख्य तक्रारी काळाचौकी पोलीस ठाणे आणि लालबाग परिसरात मदतीसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाकडे देण्यात आल्या आहेत. गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यापासून या परिसरात चोर्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. चोख पोलीस बंदोबस्त असूनसुद्धा आपल्या कौशल्याने चोरट्यांनी आपले हात साफ केले मात्र पोलिसांना त्यांच्या मुसक्या आवळताना अपयश आल्याचे दिसत आहे. काळाचौकी पोलीस ठाण्यात चोरी झाल्याच्या १५० पेक्षा अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. गेल्या 10 दिवसात या चोर्‍याचं वाढते प्रमाण पाहता खास चोरी करण्यासाठी इतर राज्यातल्या चोरट्यांचा टोळ्या आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्यावर्षी पोलिसांनी सुरतमधून आलेल्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. यावर्षीचा आकडा पाहता पराराज्यातल्या चोरट्यांनी या गर्दीत फायदा उचलल्याचे बोलले जात आहे. याबद्दल माहिती देताना काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र चिखले म्हणाले की, दरवर्षी लालबाग परळ भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस नेहमीच प्रयत्न करत असतात. यंदासुद्धा जवळपास 500 पेक्षा अधिक पोलीस लालबाग परिसरात आपले कर्तव्य बजावत होते. पण चोरी होण्याचे प्रकार थांबत नाहीत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम कार्यरत असून लवकरच त्यांना पकडले जाईल.

२२ तास चालली राजाची मिरवणूक

मुंबईची शान असलेल्या लालबागच्या राजाची मिरवणूक तब्बल २१ तास चालली. रविवारी सकाळी सुरू झालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सामील झाले होते. सकाळी तीनच्या सुमारास कोळी बांधवांच्या विशेष नृत्याने आणि पूजेने सर्वांचेच लक्ष वेधले. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेरची आरती घेऊन बाप्पाला अलोट गर्दीच्या साक्षीने गिरगाव चौपाटीच्या खोल समुद्रात निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाचा विजय असो…ही शान कोणाची,या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बाप्पासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तराफ्यात अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले.

समुद्रकिनार्‍यांवर स्वच्छता मोहीम

मुंबईत गणेशोत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला. रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जन वाजतगाजत झाले. आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप देत मुंबईतील विविध समुद्रकिनार्‍यांवर बाप्पांचे विसर्जन केले. या दरम्यान, बाप्पांच्या विसर्जनासोबतच निर्माल्य मोठ्या प्रमाणात समुद्रात टाकण्यात आले होते. त्यामुळे समुद्र किनारे विद्रुप आणि प्रदुषित झाले. विसर्जनानंतर शहरातील समुद्र किनार्‍यांवर विविध संघटनांमार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सोमवारी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे सकाळी ८ च्या दरम्यान दादर चौपाटी येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. तर ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटी येथे साफसफाई केली. या मोहिमेमध्ये डबेवाल्यांच्या सोबत कमलाबाई एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष पवनजी अग्रवाल तसेच कॉलेजच्या विद्यार्थींची टीमदेखील सहभागी झाली होती, अशी माहिती मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुषाभ तळेकर यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानाचे दूत असलेल्या डबेवाल्यांच्या सदस्यांनी गिरगाव चौपाटी येथे साफसफाई मोहीम राबवली.

सुदैवाने अनर्थ टळला

लालबाग राजाच्या विसर्जनावेळी सोमवारी सकाळी बोट कलंडल्यामुळे पाच जण समुद्रात पडले. त्यापैकी दोन जणांना सुखरुप बाहेर काढून नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काजल मेयर (३१) आणि अवनी (५) अशी त्यांची नावे आहेत. अजून तीन जण रुग्णालयात दाखल होतील, असे नायर रुग्णालयातील डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. या बोटीमधील महिला आणि मुलीवर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मात्र लालबाग राजाच्या विसर्जनाच्यावेळी मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

‘खालू बाजा’ला पसंती

खालू बाजा, कातकरी बाजा ही नावे हल्लीच्या पिढीला नवीन असतील. डॉल्बी-डीजेच्या जमान्यात ही पारंपरिक वाद्य कुठेतरी हरवत चालली आहेत. डीजेवर बंदी असल्याने गणपती विसर्जन कसे करायचा असा प्रश्न मुंबईसह राज्यातील गणेशोत्सव मंडळांना पडला होता. पण आपली संस्कृती जपण्यासाठी आणि पारंपरिक वाद्यांना पसंती देत विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील संत ज्ञानेश्वर नगर गणेशोत्सव मंडळाने रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘खालू बाजा’ आणला होता. गेल्या सात वर्षांपासून ते हा खालू बाजा आणत आहेत. या खालू बाजाला मंडळातील तरुणांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहेत. आता डीजेवर बंदी घातल्यामुळे यावर्षी रायगडमधून तीन खालू बाजा मुंबईत आले होते. त्यातील दोन पथके ही लालबागमध्ये तर एक पथक विक्रोळीमध्ये आले होते.

१ हजार टन निर्माल्य

विसर्जनानंतर महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनाने सर्व विसर्जन स्थळांवरील तसेच रस्त्यांवरील कचरा व इतर टाकाऊ साहित्य सुमारे १ हजार टन निर्माल्य गोळा केले. २०१७ मध्ये १३७२ टन निर्माल्य गोळा करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here