घरमुंबईडीजे बंद! मग मिरवणुकीत वाजवायचे काय?

डीजे बंद! मग मिरवणुकीत वाजवायचे काय?

Subscribe

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक नेहमीच राज्यात चर्चेचा विषय असते. अनेकजण या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अनंत चतुर्दशीला पुण्यात येतात. विशेष म्हणजे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सुमारे ८० टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे डीजे आणि डॉल्बी म्युझिक सिस्टिमचाच वापर करतात. यंदा हायकोर्टाने त्यावर बंदी घातल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत वाजवायचे काय, असा प्रश्न गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना पडला आहे. आता येत्या रविवारी मंडळे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मागील अनुभवावरून मंडळांचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात डीजेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुण्यात गेल्या वर्षीपर्यंत विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर होत होता. मंडळांकडून स्पिकर्सच्या भिंतीच रचण्यात येत होत्या. हिंदी आणि मराठीतील उडत्या चालीच्या गाण्यांवर थिरकणारे तरुण-तरुणींचे पाय हे विसर्जन मिरवणुकीदिवशी संध्याकाळनंतर हमखास दिसणारे दृश्य. पण रात्री १२ ते पहाटे सहा वाजेपर्यंत डीजे लावण्यास बंदी असल्यामुळे या काळात टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या ठिकाणची मिरवणूक जवळपास थांबल्याचेच चित्र दिसायचे.

- Advertisement -

डीजेचा वापर करणारी मंडळे आपला रथ बाजूला घेऊन जागेवर थांबण्याचाच पवित्रा घेत. त्यामुळे पोलीस आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक खटकेही उडत होते. यावरूनच २००५ साली पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि संपूर्ण मिरवणुकीला गालबोट लागले. त्यानंतर दरवर्षी रात्री बारानंतर पोलीस डीजेचा वापर बंद करायला लावायचे. पुन्हा पहाटे सहा वाजता आवाज वाढवत डिजेचा गजर सुरू व्हायचा. गेल्या १२ वर्षांत पुण्यातील मिरवणुकीचे हे वैशिष्ठ्यच झाले आहे. यामुळे नेहमीप्रमाणे पुण्यातील विसर्जन मिरवणूक २८ ते ३० तास लांबल्याचेही पाहायला मिळायचे.

आता कोणत्याही वेळी डीजे आणि डॉल्बी लावण्यास बंदी असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत वाजवायचे काय, हाच प्रश्न आहे. पारंपरिक वाद्य म्हणजेच ढोल-ताशा पथके असली, तरी पुण्यातील सगळ्या सार्वजनिक मंडळांना ती पुरेशी ठरणार नाहीत. त्याचबरोबर ढोल-ताशा पथकांच्या पारंपरिक वाद्यलयीपेक्षा वेगळे काहीच मिरवणुकीत ऐकायला मिळणार नाही, यामुळेही यंदाच्या मिरवणुकीत नक्की काय होणार, हाच उत्सुकतेचा विषय बनला आहे. दरम्यान, बंदी असतानाही लायटिंग केलेल्या गणपतींपुढे आजही डॉल्बी सुरू आहेत. कारण डॉल्बी बंद केले तर विविध रंगी दिवे नाचवायचे कशावर, असा प्रश्न उपस्थित होतो. डीजेवर बंदी असताना या मंडळांपुढे स्पीकर्स सुरू कसे काय, असाही प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे.

- Advertisement -

विसर्जन मिरवणुकीत डीजे नकोच!

डीजे आणि डॉल्बी म्युझिक सिस्टिमला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टाने बुधवारी स्पष्टपणे नकार दिला. या संदर्भात दाखल असलेल्या याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष कोर्टात बुधवारी झालेल्या सुनावणीकडे लागले होते. डीजे आणि डॉल्बी लावण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे आता येत्या रविवारी सार्वजनिक गणेश मंडळे काय भूमिका घेतात, याकडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक, औरंगाबाद यासह अनेक शहरांत विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी म्युझिक सिस्टिमचा वापर केला जातो.

यंदा त्यावर सरसकट बंदी असणार आहे. डीजे आणि डॉल्बीमुळे ध्वनिप्रदूषण होते. मर्यादेपेक्षा जास्त ध्वनिनिर्मिती होतेे. आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍या डीजे आणि डॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्यच आहे, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने हायकोर्टात मांडली.

गणेशोत्सवातील गोंगाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारली. याविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अ‍ॅण्ड आणि लाइटनिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवादाच्या वेळी हायकोर्टात सांगितले की, पोलिसांनी डॉल्बी व डीजेला परवानगी नाकारण्यापूर्वी कोणताही अभ्यास केला नाही. यापूर्वी पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडणारे फटाके वाजवणार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत का? लाइव्ह कॉन्सर्ट आणि इनडोअर कार्यक्रमांमध्ये डीजे व डॉल्बीला परवानगी दिली जाते. मग सार्वजनिक ठिकाणीच बंदी का, असा सवाल करत डीजे आवाजाची मर्यादा ओलांडणार नाही, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे केली.

मात्र राज्य सरकारने डीजेला परवानगी देण्याला कडाडून विरोध केला. ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणार्‍या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्य आहे, असे राज्य सरकारने सांगितले. त्यानंतर हायकोर्टाने यावर निरीक्षण नोंदवताना म्हटले की, सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टात दावा केला जातो. पण प्रत्यक्षात याचे पालन होत नाही हे सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीला कोणताही दिलासा देण्यास नकार देत या याचिकेवरील निर्णय मात्र राखून ठेवली. गेल्या वर्षभरात ध्वनिप्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यात 75 टक्के प्रकरणे डीजेची असल्याची माहितीही सरकारने न्यायालयात दिली.

दोन दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा डीजे बंदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करा, परंतु मंडळेच जर तयार असतील. तर डीजे वाजवा, असे राज ठाकरे यांनी म्हटल्याचे डीजे मालकांनी सांगितले होते. तर सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही गणपती विसर्जनात कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच, अशी भूमिका घेतली आहे.

अगोदर डीजे वाजवायची ऑर्डर घेतली होती. मात्र आता बंदीनंतर सध्या तरी सर्व ऑडर्स मी रद्द केल्या आहेत. पण शासनाने आमचादेखील विचार करावा, कारण ऐन उत्सवाच्या काळात यामुळे आमच्या पोटावर लाथ मारली गेली आहे.  – अनिकेत हलवे, डीजे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -