घरमुंबईसदोष सॅप प्रणालीचा शिक्षकांना फटका

सदोष सॅप प्रणालीचा शिक्षकांना फटका

Subscribe

शिक्षकांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सॅप प्रणालीच्या आधारावर बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आल्या आहेत. परंतु पालिकेच्या अनेक शाळांतील बायोमेट्रिक मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात सॅप प्रणालीमध्ये हजेरी नोंदवण्यात शाळा प्रशासनाची दमछाक होते. हजेर वेळेवर नोंदवण्यात येणार्‍या अडचणीमुळे अनेकदा शिक्षकांचे वेतन कापले जाते. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण असून, त्यांना घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी महापालिकेने 2017 पासून बायोमॅट्रिक मशीन बसवल्या आहेत. बायोमेट्रिक मशीनमध्ये झालेली नोंद प्रत्येक आठवड्याला शाळा प्रशासनाला सॅप प्रणालीमध्ये नोंद करणे गरजेचे आहे. सॅप प्रणालीमध्ये नोंद न झाल्यास शिक्षकांची गैरहजेरी लावण्यात येते. परंतु, या मशीन बसवल्यापासून शिक्षकांना नेहमी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या शाळेत बसवलेल्या बायोमेट्रिक मशीन वारंवार बंद पडत असतात. त्यामुळे शिक्षकांच्या हजेरीची नोंद होत नाही. हजेरीची नोंद प्रत्येक आठवड्याला सॅप प्रणालीमध्ये नोंदवणे आवश्यक असते. परंतु मशीन बंद असल्याने हजेरी नोंदवण्यात मुख्याध्यापकांना अडचणी येत असतात.

- Advertisement -

तसेच अनेकदा सर्व्हरला वारंवार समस्या येत असल्याने हजेरीची नोंद होत नाही. प्रत्येक आठवड्याच शनिवारपर्यंत सॅप प्रणालीमध्ये हजेरीची नोंद न केल्यास शिक्षकांचे आठवड्याचे वेतन कापले जाते. सर्व्हरची समस्या, वारंवार बंद पडणारी बायोमेट्रिक मशीन यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्याला याचा फटका सहन करावा लागतो. वारंवार बंद पडणार्‍या मशीन दुरुस्ती करणार्‍या कंत्राटदाराकडूनही वेळेत मशीन दुरुस्त करून मिळत नाहीत. मशीनमधील बिघाडामुळे होणार्‍या त्रासाबाबत वारंवार शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पालिका शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांकडून करण्यात आला आहे.

वेतन कपात होत असल्याने हातात पडणार्‍या तुटपुंज्या वेतनावर घर कसे चालवायचा असा प्रश्न शिक्षकांसमोर प्रत्येक महिन्याला पडतो. त्यामुळे हातात येणार्‍या प्रत्येक महिन्याच्य तुटपुंज्या वेतनावर घराचे हप्ते, वैयक्तिक कर्जाचे हप्ते, पॉलिसीचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, पीएफचे हप्ते कसे भरायचा असा बिकट प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो. त्यामळे नादुरुस्त बायोमेट्रिक व सर्व्हरच्या समस्येमुळे शिक्षकांना घर चालवाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- Advertisement -

मशीन दुरुस्तीसाठीही शिक्षकांची कसरत
बायोमेट्रिक मशीन दुरुस्तीचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडे मशीनबाबत तक्रार केल्यास त्यांच्याकडून मशीन कंपनीमध्ये आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे शिक्षकांना नादुरुस्त मशीन कंपनीकडे घेऊन जावे लागते. ही मशीन काढताना काही चूक झाल्यास त्याचा फटका शिक्षकांना सहन करावा लागतो. मशीन दुरुस्तीसाठी दिल्यानंतर आठ-आठ दिवस मशीन मिळत नाही.

प्रतीक्षा नगर आणि आरे कॉलनी या दोन शाळांमध्ये नेटवर्कची समस्या असल्याने सर्व्हर वारंवार डाऊन होतो. पालिकेच्या अन्य शाळांमधील मशीन व्यवस्थित सुरू आहेत. मशीन बंद पडल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांची सॅप प्रणालीमध्ये नोंद केली जाते. त्यामुळे शिक्षकांचे नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.– प्रकाश चर्‍हाटे, उपशिक्षणाधिकारी, महापालिका

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -