घरमुंबईशाळेतून हरवलेल्या ६ वर्षीय मुलीला दिघी पोलिसांनी शोधले

शाळेतून हरवलेल्या ६ वर्षीय मुलीला दिघी पोलिसांनी शोधले

Subscribe

दिघी परिसरातून सहा वर्षीय ईश्वरी राम भागवत शाळेच्या परिसरातून हरवली होती. तिचा अवघ्या दोन तासात दिघी पोलिसांनी शोध घेतला.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड मधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना गुन्हेगार शोधण्याऐवजी घरातून निघून गेलेली, शाळा परिसरातून हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगार शोधायचा की मुलांना हा प्रश्न पोलीस कर्मचारी विचारत आहेत. गेल्या आठ दिवसात पोलिसांनी मुलं शोधण्याची ही तिसरी वेळ आहे. याच आठवड्यात १० वर्षीय मुलगा घरातून निघून गेला होता, त्यानंतर आई वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली, मात्र मुलगा हा आपल्याच परिसरात मित्रांसोबत फिरत होता. आई वडिलांची गफलत झाली होती. तर शुक्रवारी भोसरी परिसरातून साडेचार वर्षीय मुलगी खेळता खेळता घरातून निघून गेली होती. तिला शोधण्यासाठी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती. ही घटना ताजी असताना आज रविवारी दिघी परिसरातून सहा वर्षीय ईश्वरी राम भागवत शाळेच्या परिसरातून हरवली होती. तिचा अवघ्या दोन तासात दिघी पोलिसांनी शोध घेतला.

दिघी परिसरातील मोझे या शाळेच्या परिसरातून ईश्वरी काही तास हरवली होती. मात्र तात्काळ दिघी पोलिसांनी शोध मोहीम राबवत ईश्वरीला दोन तासात शोधलं. ईश्वरीची आज रविवारी सकाळी चित्रकलेची परीक्षा होती. त्यासाठी ती मोझे शाळेत आली. साडेदहा वाजता परीक्षा संपल्यानंतर नेहमी प्रमाणे शाळेच्या बाहेर येऊन थांबली परंतु आज रविवार असल्याने तिला घ्यायला बस येणार नव्हती. ईश्वरी अर्धा किलोमीटर पुढे निघून गेली तिला रस्ता समजला नाही.

- Advertisement -

पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे,मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.गेल्या आठ दिवसात मुलं शोधण्याची तिसरी वेळ आहे.पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले तर अश्या घटना टाळता येतील.
– स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त

अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने तिचे वडील राम भागवत हे शाळा परिसरात ईश्वरीला घेण्यासाठी आले.परंतु ईश्वरी कुठेच दिसत नव्हती,सर्व मुले शाळेतून निघून गेलेली होती. वडिलांनी तिचा शोध घेतला, मात्र ईश्वरी भेटत नव्हती तब्बल एक तास तिचा शोध सुरू ठेवला अखेर दिघी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी वडील राम हे गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लावंड, पोलीस अधिकारी अशोक तरंगे, महिला पोलीस अधिकारी कदम यांच्या टीमने ईश्वरीचा शोध घेण्यासाठी ३ अधिकारी आणि १२ कर्मचारी कामाला लावत स्वतः शोध घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली दुपारी एकच्या सुमारास दिघी पोलिसांना ईश्वरीला शोधण्यात यश आले. ईश्वरी साई पार्क परिसरात मिळाली. ईश्वरीला पाहताच आई वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, एकाच आठवड्यात मुलं हरवण्याची किंवा घरातून निघून जाण्याची ही तिसरी वेळ आहे.त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगार शोधायचा की मुलांना शोधायचे हा मोठा प्रश्न आहे.तसेच शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याने पालक जोखीम घ्यायला तयार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -