माथेरानची राणीचा डौल वाढणार

विस्टाडोम कोचमुळे प्रवासी निसर्गाच्या थेट सानिध्यात

Mumbai
Matheran Mini Train

माथेरानला फिरायला जाणार्‍या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. माथेरानच्या राणीत प्रवासादरम्यान प्रवाशांना डोंगरदर्‍यांतील निसर्ग सौंदर्य पाहता येणार आहे. शुक्रवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासोबत बैठक घेऊन नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला पारदर्शक असा विस्टाडोम कोच लावण्याबाबत चर्चा केली. लवकरच हा निर्णय अमलात येणार आहे.

अमन लॉज ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेनला प्रवाशांची मोठी गर्दी असते. पर्यटक आणि प्रवाशांची या गाडीला मोठी पसंती मिळते. पर्यटकांना आता मिनी ट्रेनमधून माथेरानच्या दर्‍याखोर्‍यातील निसर्गसौंदर्य पाहता येणार आहे.येत्या २३ फेबु्रवारीपासून गाडीला हा विस्टाडोम कोच जोडला जाणार आहे. सध्या असा कोच डेक्कन क्वीन, मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी आणि पंचवटी या एक्स्प्रेस गाड्यांना जोडण्यात आला आहे. या डब्याच्या खिडक्या आकाराने मोठ्या असतात. तसेच जवळपास हा संर्पूण डबाच पारदर्शक बनवला गेलेला असतो. नेरळ-माथेरान हे सात किमीच्या अंतरावर माथेरानच्या राणीला हा नवा डबा जोडला जाणार आहे.