‘कंगणावर प्रतिक्रिया देऊन तिला मोठे करू नका’, मातोश्रीवरुन शिवसेना प्रवक्त्यांना कानपिचक्या

sanjay raut and kangana ranaut

शिवसेना विरुद्ध कंगना असे वाकयुद्ध रंगले आहे. त्यातच कंगनाने मी ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहे काय ‘उखडायचे ते उखडा’ असे खुले आव्हानच शिवसेनेला दिले होते. तसेच आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयावर हातोडा चालविल्यानंतर चवताळलेल्या कंगनाने शिवसेनेला ‘बाबर सेना’ म्हणून संबोधले आहे. कंगना आज सकाळपासूनच ट्विटवर ट्विट करत शिवसेनेवर हल्ला करत आहे. मात्र शिवसेना प्रवक्ते आणि नेत्यांना आता शांत रहा, असे फर्मान देण्यात आले आहे. कंगना आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईवर काही वक्तव्य करु नका, असे आदेशच मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत.

कंगना राणावत हीने काही दिवसांपूर्वी मुंबईला पाक व्याप्त काश्मीरची उपमा दिली होती. त्यानंतर शिवसेना आणि कंगनामधील शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी पुर्ननियुक्ती झालेल्या खासदार संजय राऊत यांनीही देखील ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी ट्विट करत एकमेकांवर निशाणा साधण्यात येत होता.

त्यातच कंगना राणावतने ६ तारखेला आपला एक व्हिडिओ पोस्ट करत शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारला आव्हान दिले. ‘मी मुंबईत ९ सप्टेंबरला येत असून मला रोखून दाखवा’, असे कंगना म्हणाली. दुसऱ्याच दिवशी कंगनाला केंद्र सरकारच्यावतीने वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. कंगनाच्या मदतीसाठी रामदास आठवले यांचे कार्यकर्ते देखील उतरलेले आहेत. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने नियमांवर बोट ठेवून कंगनाच्या घरामध्ये थाटलेले मणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय तोडले.

कंगनाचे कार्यालय तोडल्यानंतर कंगनाने शिवसेनेला बाबर सेना म्हणून हिणवायला सुरुवात केली आहे. तसेच #DeathofDemocracy असा हॅशटॅग वापरून शिवसेनेविरोधात ट्विटची मालिका सुरु केली. त्यामुळे थोड्याच वेळात हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला. यानंतर शिवसेनेने सावध पवित्रा घेत कंगना प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, असा आदेशच शिवसेनेच्या प्रवक्त्यांना दिला आहे.