घरमुंबईसाहित्य संमेलनाच्या वादात सरकारला गोवू नका

साहित्य संमेलनाच्या वादात सरकारला गोवू नका

Subscribe

सहगल प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते. तथापि यवतमाळ येथे आयोजित साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरुन वाद उभा केला जात आहे. यात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्नसुद्धा काही माध्यमे हेतूपुरस्सर करीत आहेत. अ.भा. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आला आहे.

साहित्य संमेलनांमधून सरकारवर,समाजातील निरनिराळ्या विषयांवर मते नेहमीच व्यक्त केली जात असतात. त्या मतांकडे-मंथनाकडे सरकारसुद्धा सकारात्मकपणेच पाहत असते. त्यामुळे ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करु नये, असेही यात म्हटले आहे. संमेलन आयोजकांनी नयनतारा सहगल यांना संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रित केले होते, त्याला आक्षेप घेत नयनतारा सहगल या इंग्रजी साहित्यिका असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शेतकरी न्याय हक्क समितीसह काहींनी त्यांना विरोध दर्शविला होता. मनसेच्या एका स्थानिक नेत्यानेही विरोध करत संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राजकीय पातळीवर आणखी वाद वाढला. त्यानंतर मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी सहगल यांच्या नावाला आमचा विरोध नाही. नयनतारा सहगल यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांना विरोध नाही, अशी भूमिका मांडली.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट दिलगिरी व्यक्त करत नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल, तसेच ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील त्या एक वाहक होणार असतील तर मला किंवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारण नाही. पक्षाचे नेते-प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी हीच भूमिका स्पष्ट शब्दात मांडली होती. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरुर यावे, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. मराठी साहित्य संमेलन हे आपले संमेलन आहे. या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकार्‍यांच्या भूमिकेमुळे जो मनस्ताप झाला असेल, त्याबद्दल मी एक मराठी भाषाप्रेमी या नात्याने मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे ठाकरे यांनी म्हटले.

दरम्यान, नयनतारा सहगल यांना पाठवलेले संमेलनाचे निमंत्रण अचानक रद्द करून त्यांच्या विचारस्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली आहे. राजकीय दबावापोटी हा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप करत दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक संजीव खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी यवतमाळ येथील संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -