शक्य तीच कामे करा, आवाक्याबाहेरच्या कामांना हात लावू नका

Mumbai
प्रविणसिंह परदेशी यांची सर्व अधिकार्‍यांना सूचना

महापालिकेच्या आयुक्तपदी असताना अजोय मेहता यांनी सुरु केलेल्या मासिक आढावा बैठकीची परंपरा प्रविणसिंह परदेशी यांनी पुढे आयुक्तपदाची सुत्रे हाती घेत कायम ठेवली आहे. मात्र, या आढावा बैठकीत, आयुक्तांनी जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्टसह इतर प्राधिकरणांच्या अधिकार्‍यांना बोलावून अडचणींवर कशाप्रकारे मात करता येईल याचा विचार केला. आयुक्तांनी यावेळी, मला दाखवण्यासाठी कोणती कामे हाती घेवू नका. शक्य आहे तीच कामे करा, उगाच आवाक्याबाहेरच्या कामांना हात घालू नका तसेच कुठलीही आश्वासन देवू नका,असे स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी बुधवारी सर्व खातेप्रमुख, सहायक आयुक्त, उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांसोबत मासिक आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे महापालिकेच्या अधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अशक्य असणार्‍या गोष्टी करण्याऐवजी शक्य असणार्‍या गोष्टी करण्याकडेच भर द्या,अशाप्रकारचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. जे काही कराल, त्यांची माहिती मला द्या,असेही त्यांनी सांगितले.

विभाग कार्यालय आणि मध्यवर्ती खाते यांच्यामध्ये समन्वय नसल्याने अनेक पायाभूत विकास कामे तसेच प्रकल्प कामे रखडली जातात. त्यामुळे यापुढे दोघांमध्ये समन्वय राखून निर्णय घेतले जावेत. कोणत्याही विकास कामांसाठी बैठक घेताना सबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेवून तिथल्या तिथेच निर्णय घेतले जावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिल्याचे समजते.

ध्यानधारणेने बैठकीला सुरुवात

महापालिका आयुक्तांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांमध्ये एकाग्रता निर्माण व्हावी, याकरता सुरुवातीला सर्वांना ध्यानधारणा करायला लावली. तब्बल दहा मिनिटे ध्यानधारणा केल्यानंतर आयुक्तांनी आपल्या आढावा बैठकीला सुरुवात केली. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली बैठक संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती.