घरमुंबईमुलीच्या मृत्यूला डॉक्टर आणि महापालिकाच जबाबदार !

मुलीच्या मृत्यूला डॉक्टर आणि महापालिकाच जबाबदार !

Subscribe

एअर हॉस्टेसचा कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहून आयपीएस अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र तिचे स्वप्न अधुरेच राहिले, असे चव्हाण हे डोळयातील अश्रूंना वाट करून देत सांगत होते.

ठाणे : ठाण्यातील सावरकर नगर परिसरात राहणारी १९ वर्षीय तेजस्विनी चव्हाण हिचा रविवारी डेंग्यूने बळी घेतलाय. चुणचुणीत, हुशार असणार्‍या तेजस्विनीच्या मृत्यूने ठाण्यात हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि ठाणे महापालिकेची अनास्था, यामुळेच माझ्या मुलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप तेजस्विनीचे वडील दत्ता चव्हाण यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला. तेजस्विनीच्या आठवणी सांगताना वडीलांचे डोळे पाणावले होते. एअर हॉस्टेसचा कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहून आयपीएस अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र तिचे स्वप्न अधुरेच राहिले, असे चव्हाण हे डोळयातील अश्रूंना वाट करून देत सांगत होते.

तेजस्विनीचे वडील दत्ता चव्हाण

सावरकरनगर येथील वीरसंभाजी गल्ली परिसरात राहणारे दत्ता चव्हाण यांची तेजस्विनी ही लहान कन्या होती. तेजस्विनीला ताप आल्याने फॅमिली डॉक्टर सिंग यांच्याकडे तिने चार दिवस ट्रिटमेंट केली. मात्र पाचव्या दिवशी तिचा आजार खूपच बळावला, तिला उलटया होऊन लागल्याने परिसरातील प्रांजली हॉस्पिटलमध्ये तिला अ‍ॅडमिट करण्यात आले. त्या ठिकाणी रक्त तपासणी केल्यानंतर डेंग्यूचे निदान झाले. त्यावेळी तिच्या शरीरातील प्लेटसलेट्स २५ हजार झाल्या होत्या.

- Advertisement -

डॉक्टरांनी प्लेटसलेटस चढविल्यानंतरही त्या वाढण्याऐवजी २१ हजारांवर आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिला त्वरीत मोठ्या रूग्णालयात हलविण्यास सांगितले. तेजस्विनीला वसंत विहार परिसरातील ब्रेटली रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण मृत्यूने तिला गाठले. रविवारी तिच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात शोककळा पसरली. गेल्या चार दिवसांपासून तिची फॅमिली डॉक्टरकडे ट्रिटमेंट होती. मात्र त्यांच्याकडूनही रक्त तपासणी संदर्भात कोणतेच मार्गदर्शन मिळाले नाही. तेजस्विनीला अ‍ॅडमिट करू का, असेही तिच्या आईने डॉक्टरांना विचारले होते. पण त्याची काही गरज नाही असे डॉक्टर म्हणाले. त्यामुळे आम्ही गाफिल राहिलो. फॅमिली डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविषयी तेजस्विनीच्या वडीलांनी नाराजी व्यक्त केली.

तेजस्विनीची रक्त तपासणी वेळेतच केली असती, तर डेंग्यूचे निदान लवकर होऊन उपचार करून तिला वाचवू शकलो असतो. पण आजार बळावल्यानंतर डेंग्यूचे निदान झाल्याने काहीच करू शकलो नाही, असे वडिलांनी सांगितले. सावरकर नगर परिसरात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत 5 रुग्ण दगावले आहेत. मात्र बळी गेल्यावर महापालिकेचे अधिकारी धाव घेत असल्याची नाराजी तिच्या वडिलांनी व्यक्त केली. त्यानंतर पालिकेकडून परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

- Advertisement -

पावसाळा सुरू झाल्यानंतर अजूनपर्यंत सावरकरनगर परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली नव्हती. मृत्यू झाल्यानंतर आता फवारणी करून उपयोग काय अशी संतप्त भावना तेजस्विनीच्या वडीलांनी व्यक्त केली. राज्य सरकार असो वा महापालिका सरकारी यंत्रणेच्या अनास्थेविषयी त्यांनी प्रकट नाराजी व्यक्त केली.

तिचे आयपीएसचे स्वप्न भंगले …

तेजस्विनीने एअर हॉस्टेसचा कोर्स पूर्ण करून दोन वर्षाचा इलेक्ट्रीक इंजिनिअरींगचा डिप्लोमा केला होता. पुढच्या महिन्यात एअर हॉस्टेसच्या मुलाखती सुरू होणार होत्या, त्यामुळे मुलाखतीची तिने जय्यत तयारी केली होती. एअर हॉस्टेसची नोकरी केल्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहून युपीएससीची परीक्षा देऊन आयपीएस अधिकारी बनण्याचे तिचे ध्यये होते, असे वडीलांनी सांगितले. तेजस्विनीला कबड्डीची खेळाडू होती, तिला समाजसेवेची आवड होती. चव्हाण यांची मोठी मुलगी पल्लवी ही सुध्दा एअर हॉस्टेसचा कोर्स करीत आहे. लहान बहिणीच्या आठवणीने पल्लवी धाय मोकलून रडत आहे. तेजस्विनीचे एअर हॉस्टेसचा स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता पल्लवीवर पडली आहे.

तेजस्विनी अतिशय बोलक्या स्वभावाची आणि धैर्यवान असल्याने मैत्रिणींमध्ये ती लोकप्रिय होती. समाजसेवेच्या कामात नेहमीच पुढे असणारी तेजस्वीनी अनेकांच्या सुख दु:खात सहभागी होत असे. त्यामुळे तिच्या अकाली मृत्यूने परिसरातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांतपणे निघाल्या. दत्ता चव्हाण हे मराठा क्रांती मोर्चाचे ठाण्याचे समन्वयक आहेत. त्यामुळे ठाण्यातील मराठा आंदोलनात तेजस्विनीने हिरीरीने सहभाग घेतला होता. त्यामुळे तेजस्विनीच्या मृत्यूनंतर सोशल मिडीयावर ठाण्याची रणरागिणी म्हणून तिला श्रध्दांजली वाहण्यात आली. तेजस्विनीची आई वंदना चव्हाण यांना सुध्दा डेंग्यू झालाय. प्रांजली हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तेजस्विनीच्या अकाली मृत्यूने चव्हाण कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. सावरकरनगर परिसरातही शोककळा पसरलीय. तेजस्विनीचा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलाय.

तेजस्विनी चव्हाण हिच्या मृत्यूनंतर केलेल्या रक्त तपासणीच्या अहवालात डेँग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तिचा मृत्यू हा डेंग्यूने झालेला नाही. वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होऊन शरीरात जंतूचा संसर्ग झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचा रूग्ण आढळल्यानंतर पालिकेकडून त्या भागाची तपासणी करून वेळीच दक्षता घेतली जाते. – डॉ रामराव , केंद्र वैद्यकीय अधिकारी ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -