घरमुंबईतेरा सेमीची गाठ छातीतून बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश

तेरा सेमीची गाठ छातीतून बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश

Subscribe

गळा आणि छातीत मिळून असलेली तब्बल १३ सेमीची गाठ दुर्बिणीद्वारे गळ्यातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या उपचारामुळे रुग्णाला नवे जीवन मिळाले.

मुंबईत राहणाऱ्या ३८ वर्षीय नाझनीन खान यांच्या छातीतून तब्बल १३ सेंटिमीटरची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. नाझनीन खान यांना चालताना आणि काम करताना सतत दम लागायचा. कित्येक वर्ष त्यांच्यावर दम्याचे उपचारही सुरू होते.  त्यानंतर नाझनीन यांना श्वास घेताना आणि अन्न गिळतानाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने त्यांना कोहिनूर रुग्णालयात दाखल केलं. कोहिनूर रुग्णालयातील कान-नाक-घसा शल्यविशारद डॉ संजय हेलाले यांनी नाझनीन खान यांच्या छातीत असलेली गाठ दुर्बिणीद्वारे गळ्यातून बाहेर काढली. भूलतज्ज्ञ डॉ. रत्नाकर गोसावी आणि कार्डिओथेरॉसिस सर्जन डॉ. उमाकांत पाटील यांच्या साहाय्याने ३ तास चाललेली ही कठीण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

मागील अनेक वर्षांपासून होत होता त्रास

साकीनाका येथील रहिवासी असलेल्या नाझनीन यांना गेली ८-१० वर्षे श्वसनाचा त्रास होत होता. त्यांनी अनेक डॉक्टरांकडून उपचारही घेतले, पण त्यांच्यावर दमा, अस्थमा, ब्रॉकाइटिससारख्या आजारांचे उपचार केले गेले. गेले काही दिवस त्यांचा त्रास फारच वाढला आणि झोपेत गुदमरणे सुरू झाले. शेवटी एका डॉक्टरांनी सी टी स्कॅन केल्यावर समजले कि छातीत आणि मानेत मिळून तब्बल १३ सेमीची गाठ आहे. अर्थात यावर छातीची शस्त्रक्रिया सुचविण्यात आली. परंतु नाझनीन यांच्या नातेवाईकाने कोहिनूरमधील डॉ हेलालेंना दाखविण्याचा सल्ला दिला. त्यावर डॉ हेलालेंनी इतर डॉक्टरांच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया वेगळ्या प्रकारे करण्याचे ठरवले.

- Advertisement -

भूल न देताच केले उपचार

छातीतल्या गाठीमुळे रुग्णाची श्वसननलिका दबलेली होती. अशा अवस्थेत शस्त्रक्रियेसाठी भूल देणे हे आव्हान असते. थोडासा विलंब सुद्धा रुग्णाचा जीव घेऊ शकतो, हा धोका टाळण्यासाठी डॉ गोसावी यांनी भूल न देताच रुग्णाच्या श्वसननलिकेत जागृत अवस्थेत ऑक्सिजन नळी टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुर्बीण टाकली गेली व दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केली गेली. गळ्यात गाठ होणे ही साधारण बाब आहे, पण गळ्यातील गाठीच्या दहा पटीने मोठा भाग छातीत असणे ही दुर्मीळ केस होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. म्हणून एका बाजूला कोहिनूरची एक टीम छातीच्या शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज होती. पण छातीतल्या मोठ्या भागाचे तुकडे करून ते गळ्याद्वारे बाहेर काढण्याचे कसाब डॉक्टरांना साधले आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रियेनंतर काही काळातच नाझनीन घरी परतल्या त्या निश्चिन्त होऊनच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -